पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती; प्लास्टिक बंदीचा संदेश
| रसायनी | प्रतिनिधी |
जागतिक महिला दिनानिमित्त बिर्ला कार्बन इंडिया प्रा. लि., पाताळगंगा नदी आणि पर्यावरण संवर्धन चॅरिटेबल ट्रस्ट तसेच साहस फाउंडेशन रसायनी यांच्या संयुक्त विद्यमाने मोहोपाडा परिसरात महिलांसाठी वॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. ही वॉकेथॉन मोहोपाडा येथील अचानक मैदान येथून सुरू होऊन वृंदावन फ्लोरा सोसायटी, चांभार्ली येथे समाप्त झाली. या वॉकेथॉनमध्ये परिसरातील सुमारे 130 ते 140 महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
महिला दिनाचे औचित्य साधून महिलांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करणे तसेच समाजात एकात्मता वाढविणे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता. यावेळी प्लास्टिक बंदी आणि पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती करण्यासाठी सहभागी महिलांना कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. पर्यावरण रक्षणासाठी प्लास्टिकचा वापर टाळावा आणि कापडी पिशव्यांचा वापर करावा, असा संदेश उपस्थितांना देण्यात आला.
या कार्यक्रमाला पाताळगंगा नदी आणि पर्यावरण संवर्धन चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष अरुण गोविंद जाधव यांची विशेष उपस्थिती होती. तसेच पोलिस उपनिरीक्षक मनोज महाडिक, रेश्मा कुरूप, दीपिका भंडारकर यांच्यासह परिसरातील अनेक महिलांनी उत्साहाने सहभाग नोंदवला.
या उपक्रमाच्या माध्यमातून पाताळगंगा नदी आणि पर्यावरण संवर्धन चॅरिटेबल ट्रस्ट यांनी सामाजिक बांधिलकी जपत पर्यावरण संरक्षण, महिला सक्षमीकरण आणि प्लास्टिकमुक्त समाजाचा संदेश देत समाजासाठी आदर्श कार्य केले आहे. उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक करत भविष्यातही असे उपक्रम राबवावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.
