| रसायनी | वार्ताहर |
मोहोपाडा रसायनी येथील साईबाबा मंदिराच्या 27 व्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. हे कार्यक्रम श्री साईबाबा मंदिर, एचओसी कॉलनी-मोहोपाडा येथे संपन्न झाले. यानिमित्ताने भूपाळी, काकडा आरती, महामंगल स्नान, अर्चना, आरती होऊन गायत्री (11 कुंड) यज्ञाचा कार्यक्रम झाला.
या कार्यक्रमात रसायनी पाताळगंगा परिसरातील ग्रामपंचायत सरपंच व प्रतिष्ठितांना होमहवनासाठी बसविण्यात आले. यावेळी मुख्य गायत्री यज्ञाचा मान सरपंच उमा मुंढे व माजी सरपंच संदीप मुंढे यांना देण्यात आला. सायंकाळी मोहोपाडा ते साईबाबा मंदिर साई पालखी मिरवणूक पार पडली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी साईबाबा सत्संग केंद्र, कार्यकारी मंडळ रसायनीचे अध्यक्ष एम.एस.मगर, उपाध्यक्ष आंबवणे, सचिव बी.जे.कोडिलकर, उपाध्यक्ष आर.एम. पोरे व इतर पदाधिकारी सदस्यांनी परिश्रम घेतले.