नाशकात सराफाच्या घरात नोटांच्या भिंती

| नाशिक | वृत्‍तसंस्था |

नाशिकमध्ये आयकर विभागाने एक मोठी कारवाई केली आहे. नाशिकच्या कॅनडा कॉर्नर परिसरातील सुराणा ज्वेलर्स या दुकानात आयकर विभागाच्या पथकाने धाडसत्र सुरू केले. या धाडसत्रामध्ये सुरणा ज्वेलर्समध्ये आणि कार्यालयात तपासणी केली. दुसऱ्या दिवशी सुराणा ज्वेलर्स यांच्या निवासस्थानी देखील आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी झाडाझडती घेतली. सुराणा यांच्या बांधकाम व्यवसायिकांशी संबंध असल्याचे देखील माहिती आयकरच्या अधिकाऱ्यांना मिळाल्यानंतर केलेला झाडाझडतीत तब्बल 26 कोटी रुपये कॅश, तर 90 कोटींच्या बेहिशोबी मालमत्तांचे दस्तऐवज पथकाच्या हाती लागले.

आयकर विभागाची नाशिक शहरातील कारवाई सुरू झाल्यानंतर सुराणा यांच्या कार्यालयात देखील आयकर विभागाचे अधिकारी दाखल झाले आणि त्या ठिकाणी कागदपत्रांची देखील तपासणी केली. एकाच ठिकाणी आयकर विभागाच्या वेगवेगळ्या पथकाने धाडसत्र सुरू केले. जवळपास 30 तास ही तपासणी सुरू होती आणि या तपासणी दरम्यान फर्निचरच्या प्लाऊडमध्ये अधिकाऱ्यांना नोटांची भिंत आढळून आली. यावेळी एकूण 26 कोटी रुपयांची रोकड असल्याची माहिती मिळाली. तर, दुकान आणि कार्यालयात एकूण 90 कोटींचे बेहीशेबी मालमत्तेचे दस्तऐवज देखील आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांच्या हाती लागले.

आयकर विभागाने सुराणा यांच्या दुकानात आणि कार्यालयात एकाच वेळी छापा सत्र सुरू केले. तपास सुरू केला असता यावेळी रियल इस्टेट व्यवसायाच्या कार्यालयातही एक पथक दाखल झाले होते. त्यानंतर नाशिक शहरातील राका कॉलनी या ठिकाणी असलेल्या सुराणा यांच्या आलिशान बंगल्यात देखील स्वतंत्र पथकाने तपासणी सुरू केली. शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्या कार्यालयात आणि खाजगी लॉकर्स, बँकांमधील लॉकर्समध्ये देखील तपासणी आयकर विभागाचे अधिकाऱ्यांनी केली. मनमाड आणि नांदगाव येथील त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या घरी ही देखील तपासणी करत रोख रक्कम, मालमत्तांचे दस्तऐवज पथकाने जप्त केले आहे. या कारवाईमध्ये मालमत्तांचे दस्तऐवज असलेले हार्ड डिस्क आणि पेन ड्राईव्ह देखील या पथकाच्या शोधकार्यात मिळून आले आहेत. कारवाईनंतर नाशिक शहरात एकच खळबळ उडाली आहे.

Exit mobile version