नगरसेविका डॉ. सुरेखा मोहोकर यांचे मोलाचे सहकार्य
| पनवेल | प्रतिनिधी |
प्रभाग क्रमांक 18 मधील गणेशनगर 1 एस, शबरी हॉटेलच्या मागील परिसरात 5 फेब्रुवारी रोजी लागलेल्या भीषण आगीत सात झोपड्या जळून खाक झाल्या. या दुर्घटनेत सात कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले असून, मोठे आर्थिक नुकसान झाले. आगीत विद्यार्थ्यांचे वह्या, पुस्तके आणि इतर शैक्षणिक साहित्यही नष्ट झाले.
नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षा तोंडावर असताना त्यांचे शिक्षण खंडित होऊ नये, या उद्देशाने नगरसेविका डॉ. सुरेखा विलास मोहोकर यांनी पुढाकार घेत पीडित विद्यार्थ्यांना शालेय पुस्तके, वह्या आणि आवश्यक शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. तसेच मुलींसाठी सॅनिटरी नॅपकिन्सही देण्यात आले.
आमच्याकडून शक्य ते सर्व सहकार्य केले जाईल. विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी जे काही करता येईल, ते नक्की करू, अशी भावना डॉ. मोहोकर यांनी व्यक्त केली.
या मदतकार्यावेळी डॉ. विलास मोहोकर, मनीषा परदेशी, मृणाल विचारे, जाधव काकू, जगदीश चव्हाण आणि गणेश खोत उपस्थित होते. नगरसेविकेच्या या सामाजिक बांधिलकीचे परिसरातील नागरिकांनी कौतुक केले.
