| उरण | वार्ताहर |
आठवडाभरापूर्वी सुरू झालेल्या उरण रेल्वेस्थानकाबाहेर असलेल्या वाहनतळ परिसरात बेशिस्त पद्धतीने दुचाकी उभी करण्यात येतात. या बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्याचा इशारा वाहतूक पोलिसांनी दिला आहे. उरणकरांची रेल्वे लोकलची प्रतीक्षा संपून 12 जानेवारीपासून ही सेवा सुरू झाली. यामुळे हजारो उरणकर हे या लोकलने प्रवास करीत आहेत. या रेल्वेसेवेचा सर्वाधिक फायदा हा नवी मुंबईत शिक्षण आणि नोकरीसाठी जाणाऱ्या प्रवाशांना झाला आहे.
यामुळे यापूर्वी खासगी वाहने आणि एनएमएमटी, एसटी बसने प्रवास करीत होते. आता उरण शहरापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर असलेल्या रेल्वे स्थानकापर्यंत पोहचण्यासाठी बहुतांश प्रवासी हे दुचाकीने प्रवास करीत आहेत. यामधील बहुसंख्य प्रवासी हे आपल्या दुचाकी रेल्वेस्थानकाबाहेर बेशिस्तपणे उभ्या करतात. यामुळे रेल्वे स्थानकात येणाऱ्या प्रवाशांना त्रास होतो, उज्ज्वला तांडेल या महिला प्रवाशाने सांगितले.
स्थानक परिसर हा रेल्वे विभागाच्या अखत्यारीत येत आहे. मात्र, त्याचा परिणाम स्थानकाबाहेरील वाहतुकीवर होत आहे. त्यामुळे वाहतूक पोलीस कारवाई करू शकत नाही. मात्र, नियंत्रण करण्यासाठी वाहतूक स्वयंसेवक नेमण्यात येणार असल्याची माहिती उरण वाहतूक विभागाचे साहाय्यक पोलीस निरीक्षक संजय पवार यांनी दिली.