निवेदन देऊनही पूल दुरुस्तीकडे दुर्लक्ष
| उरण | वार्ताहर |
उरण-पनवेल रस्त्यावरील बोकडविरा सिडको भवनसमोर असलेला पूल नादुरुस्त झाला आहे. याबाबत वारंवार अनेक सामाजिक संघटना, पत्रकारांनी मागणी व निवेदन देऊनही सिडको प्रशासनाने तो दुरुस्त केला नाही. त्याच्या निषेधार्थ अखिल भारतीय जनवादी संघटनेच्या माध्यमातून येत्या गुरुवार दि.12 ऑक्टोबर पासून सिडकोच्या द्रोणागिरी नोड कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
बोकडविरा गावाजवळील पूल कमकुवत झाल्याने तो अवजड वाहनांसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे एसटी व एनएमएमटी बस बंद करण्यात आल्याने त्याचा त्रास बोकडविरा, फुंडे, डोंगरी, पाणजे या गावातील ग्रामस्थांना सहन करावा लागत आहे. तसेच अवजड वाहन जाऊ नये म्हणून हाईट गेट बसविण्यात आले आहेत. याचा अंदाच छोट्या वाहन चालकांना न आल्याने अनेक अपघात घडले आहेत. त्या अपघातात एका महिलेचा मृत्यू, तर काही जखमी होण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यानंतर आंदोलन करण्यात आले होते, त्यावेळी लवकरात लवकर हा पूल दुरुस्त व हाईट गेटची उंची वाढवून एसटी बस सुरू करण्याचे आश्वासन सिडको प्रशासनाने दिले होते. त्याची पूर्तता अद्याप झालेली नाही.
या रस्त्याच्या देखभालीची जबाबदारी सिडकोची आहे. त्यामुळे रखडलेल्या खाडीपुलाची दुरुस्तीचे काम सिडकोने हाती घेऊन वाहतुकीसाठी खुला करावा, या मागणीसाठी अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या नेतृत्वाखाली गुरुवार, दि. 12 ऑक्टोबर रोजी सिडकोच्या द्रोणागिरी नोड कार्यालयासमोर चार ही गावांतील महिला, ग्रामस्थ धरणे आंदोलन करणार असल्याची माहिती संघटनेच्या राज्य उपाध्यक्षा हेमलता पाटील यांनी दिली.





