रायगडात जोरदार अतिवृष्टीचा इशारा

जिल्हा प्रशासनाचे सतर्कतेचे आवाहन
अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार 12 ते 14 सप्टेंबर 2021 या कालावधीमध्ये रायगड जिल्ह्यात जोरदार अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तविली आहे. सदर कालावधीमध्ये अति मुसळधार पावसाची शक्यता आहे.  तरी रायगड जिल्ह्यातील ग्रामस्थांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
प्रशासनाने म्हटले आहे की सध्या गणेशोत्सव सुरू असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी. पुलावरून संरक्षक दगडावरून पाणी वाहत असल्यास प्रवास टाळावा.  धाडसाने वाहन पाण्यामध्ये घालू नये.
अतिवृष्टीमुळे वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता राहील. सर्वांनी वाहतुकीचे नियम पाळावेत. अनावश्यक ओव्हर टेक करून वाहनांच्या 3-3 रांगा करू नये. ऐकेरी वाहतूक सुरू राहील, याची दक्षता घ्यावी.वाहतूक पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
 मदत आवश्यक असल्यास आपले ग्रामपंचायत तहसील कार्यालयात संपर्क साधावा तसेच जिल्हा पोलीस नियंत्रण कक्ष 02141 228473 व जिल्हाधिकारी कार्यालय नियंत्रण कक्षाशी 02141 222097 या क्रमांक वर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

दोन दिवस अ‍ॅलर्ट जारी
पुढील चार ते पाच दिवसांसाठी राज्यातील अनेक जिल्ह्यांना ऑरेंज आणि यलो अ‍ॅलर्ट जारी करण्यात आला आहे.  सोमवारी 13 सप्टेंबरला पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा आणि कोल्हापूरला ऑरेंज अ‍ॅलर्ट, तर मुंबई, सिंधुदुर्ग, नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, बीड, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, वाशिम, बुलडाणा, अकोला, यवतमाळ, वर्धा, नागपूर, अमरावती, आणि गोंदिया, भंडारा, गडचिरोली जिल्ह्यांना यलो अ‍ॅलर्ट दिला आहे. 14 सप्टेंबरला पालघर, ठाणे, रायगड,पुणे, सातारा आणि कोल्हापूरला ऑरेंज अ‍ॅलर्ट, तर मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नांदेड, परभणी, हिंगोली, नाशिक, नंदूरबार, जळगाव, धुळे, औरंगाबाद, जालना, बीड, आणि अमरावती यलो अ‍ॅलर्ट दिला आहे.

Exit mobile version