मान्यवरांच्या हस्ते नाट्य गौरवाने सन्मान
| अलिबाग | प्रतिनिधी |
अनंत सांस्कृतिक व सामाजिक कलामंच पेझारी या संस्थेचा 43 वा वर्धापनदिन शिवाई मंदिर बांधण येथे उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते अभिनेत्री डॉ. जुईली टेमकर, अभिनेता परेश ठाकूर, दिग्दर्शक मिलन पाटील, आदर्श शिक्षक देवेंद्र पाटील, नाट्य लेखक प्रकाश पाटील यांना नाटककार कै.अनंत पांचाळ नाट्य गौरव सन्मान 2025 ने सन्मानित करण्यात आले. त्याचप्रमाणे अनंत सांस्कृतिक कलामंच पेझारी या संस्थेने राज्यस्तरीय बालनाट्य स्पर्धेत सादर केलेल्या बालनाट्य ‘जादूचा दिवा’ यातील बालकलाकार आणि तंत्रज्ञ यांना सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून चित्रपट दिग्दर्शक, संगीतकार, अभिनेता विक्रांत वार्डे, नाट्य व चित्रपट निर्माता, दिग्दर्शक दत्त अवधूत एन्टरटेन्मेन्ट यांच्यासह ज्येष्ठ अभिनेत्री विजयाकुडव, अभिनेत्री ज्योती राऊळ, लेखक बाळ सिंगासने, गट शिक्षण अधिकारी नितिश पाटील, नाट्य निर्माता विकास जाधव, आंबेपूरचे माजी सरपंच शैलेश पाटील, प्रकाश म्हात्रे, योगेश पवार, राजेंद्र म्हात्रे, प्रकाश म्हात्रे, संतोष राऊळ आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान, अभिनेत्री ज्योती राऊळ यांनी सांगितले की, कलाकारांनी फक्त रिलस्टार बनू नका तर चांगले कलाकार बना. स्टार हा फक्त रात्री पुरताच चमकतो, कलाकार हा अखंड अविरत जगला पाहीजे. तसेच, एखादी संस्था स्थापन करणे सोपे असते. परंतु, 43 वर्ष विविध उपक्रम राबवून संस्था योग्य रित्या चालविणे कठीण असते. त्याबद्दल संस्थेचे संस्थापक राजन पांचाळ, उपाध्यक्ष देवेंद्र केळूसकर, प्रमोद पाटील आणि संस्थेच्या सदस्यांचे ज्योती राऊळ यांनी कौतुक केले.
दरम्यान, अनंत सांस्कृतिक कलामंच घेऊन येत असलेल्या व्यवसायिक नाटकाचे पुजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. आणि त्याच नाटकातील ‘बतावणी’ कलाकार जितेंद्र काकडे आणि सुरज आयरे यांनी सादर करुन उपस्थितांचे मनोरंजन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे संस्थापक राजन पांचाळ यांनी केले.तर, कार्यक्रमाचे सुत्रसंचालन देवेंद्र केळूसकर यांनी केले. आभार प्रदर्शन अभिनेते प्रतिक पानकर यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रमोद पाटील, जितेंद्र काकडे, सुरज आयरे, सुहास पाटील, तुषार पाटील, तुषार गणपत पाटील, रश्मी पांचाळ, सीमा काकडे, वृषाली आयरे व उपासना जुईकर यांनी नियोजन केले.