वाहतूकदारांच्या मागण्यांसाठी उपोषणाचा इशारा

| पनवेल | प्रतिनिधी |

राज्यातील वाहतूकदारांच्या प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जय भवानी ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने 5 डिसेंबरपासून खारघर टोलनाक्याजवळ आमरण उपोषण करण्यात येणार असल्याची घोषणा संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र वनवे यांनी केली. मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचा निर्धार संघटनेने व्यक्त केला आहे. वाहतूकदारांनी शासनाकडे आठ प्रमुख मागण्या मांडल्या आहेत.

परिवहन विभाग आणि वाहतूक पोलिसांकडील थकीत दंड पूर्णपणे माफ करावेत, मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वेगमर्यादा ताशी 40 वरून 60 किलोमीटर करावी, तसेच पनवेल परिवहन कार्यालयातील वाहन पासिंग प्रक्रियेदरम्यान होणारी कथित आर्थिक लूट थांबवावी, अशी मागणी करण्यात आली आहे. पनवेल येथील आर्या एनर्जी लिमिटेड एटीएस केंद्रात वाहन पासिंगदरम्यान जाणीवपूर्वक वाहने अपात्र ठरवून आर्थिक गैरव्यवहार होत असल्याचा आरोपही संघटनेने केला आहे. या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. याशिवाय प्रमुख शहरांमध्ये अवजड वाहनांच्या प्रवेशाच्या वेळांचा पुनर्विचार करावा, रस्त्यांवर उभ्या वाहनांवरील दंडात्मक कारवाई थांबवावी आणि दंडातील 20 टक्के सवलतीऐवजी संपूर्ण थकीत दंड माफ करावेत, अशीही मागणी आहे.

40 फूट फोर्टी टेलर वाहनांच्या आरसी बुकमध्ये वाहनाची लांबी 16 मीटर अशी नोंद करावी, ही मागणीही संघटनेने केली आहे. या आंदोलनाला जय भवानी ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे कमिटी सदस्य तसेच राज्यातील विविध वाहतूकदार संघटनांचा पाठिंबा असल्याचे वनवे यांनी सांगितले. आता या मागण्यांवर शासन काय भूमिका घेते, याकडे वाहतूकदारांचे लक्ष लागले आहे.

Exit mobile version