निकृष्ट कामांबाबत जन आंदोलनाचा इशारा

। कोर्लई । वार्ताहर ।
चक्क समुद्राची वाळू (पुळन) वापरून मुरुड शहरातील होत असलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामाबाबत आक्रमक पवित्रा घेत जनार्दन सदाशिव तथा आण्णा कंधारे यांनी याविरोधात जन आंदोलनाचा इशारा देण्यात आला असून नगरपालिकेला अंधारात ठेवून जर संबंधित ठेकेदार केवळ आपली दिशाभूल करत असताना प्रशासन दुर्लक्ष करीत आहे का ? असा सवाल नागरिकांतून विचारला जात आहे.
नगरपरिषदेला विविध विकास कामांसाठी करोडो रुपयाचा निधी आला आहे. परंतु प्रत्येक काम मजबूत व चांगल्या दर्जाचे व्हावे. यासाठी नगरपरिषद प्रशासन कोणती दक्षता घेत नसून कार्यालयातच बसून राहून ठेकेदाराला मलिदा लाटण्याचा मार्ग मोकळा करून देत आहे काय ? असा सवाल विचारला जात आहे.अशा तर्हेने निकृष्ट दर्जाची कामे झाली तर सदरची विकास कामे अनेक वर्षभर देखील टिकणार नाहीत. संबंधित अधिकारी मात्र याकडे दुर्लक्ष करीत असतील तर भारतीय जनता पार्टी कदापि सहन करणार नाही.याविरोधात वेळप्रसंगी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही आण्णा कंधारे यांनी दिला असून याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित प्रशासनाची राहील असे म्हटले आहे. दरम्यान सबनीस आळी भागात गटारांची कामे सुरु असताना उमेश माळी व बाळा भगत याना हि बाब निदर्शनास आणून दिली याबाबतचे सर्व फोटो सुद्धा असून सदरची बाब नगरपरिषदेच्या निदर्शनास आणून दिल्यावर सध्या हे काम बंद ठेवण्यात आले असल्याचे समजते.

Exit mobile version