राज्यात मुसळधार पावसाचा इशारा

। मुंबई । प्रतिनिधी ।
थंडीचा तडाखा वाढत असताना आता पावसानेही हजेरी लावली आहे. चंद्रपूरमध्ये अनेक भागांमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे. सकाळपासून ढगाळ वातावरण व सूर्यदर्शन नसल्याने गारठ्यात वाढ झाली आहे. जिल्ह्याच्या बहुतांश भागात पावसाच्या सरी कोसळत आहेत.
सकाळच्या सुमारास कोसळत असलेल्या या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली. चंद्रपूर जिल्ह्यासाठी हवामान विभागाने 10 आणि 11 जानेवारी रोजी ऑरेंज आणि येलो अलर्ट जारी केला आहे. शेत शिवारात कापून ठेवलेली धान्ये सुरक्षित ठिकाणी नेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. शिवारात असलेल्या तूर, गहू, चणा या पिकांना पावसाचा फटका बसणार आहे.
दरम्यान, मुंबई प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्राने दिलेल्या सूचनेनुसार, 10 जानेवारी रोजी जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. तसेच जिल्ह्यातील एक ते दोन ठिकाणी वादळी, मेघगर्जनेसह गारा पडण्याची शक्यता वर्तविली आहे. तर 11 जानेवारी रोजी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारे, विजेचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी विशेषतः शेतकर्‍यांनी पिकांची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

Exit mobile version