भूसंपादनासाठी आठ दिवसांची मुदत; सुरक्षा भिंतींचे काम थांबवले
| नेरळ | प्रतिनिधी |
नेरळ-कळंब रस्त्याच्या रुंदीकरणासाठी शेतजमिनींचे भूसंपादन झाले नसल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी बंद पाडलेल्या कामाबाबत बांधकाम विभाग आणि शेतकरी यांच्यात झालेली बैठक निष्फळ ठरली. भूसंपादनाचे पुरावे सादर करण्यासाठी शेतकऱ्यांनी विभागाला आठ दिवसांची मुदत दिली आहे. या मुदतीत समाधानकारक निर्णय न झाल्यास पुन्हा रस्त्याचे काम बंद पाडण्याचा इशारा देण्यात आला. दरम्यान, तोपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या सुरक्षा भिंतींचे काम थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला.
माथेरान-नेरळ-कळंब राज्य मार्ग क्रमांक 109 चे काँक्रिटीकरण आणि रुंदीकरण एमएसआयडीसीमार्फत सुरू आहे. मात्र, रस्त्यासाठी अतिरिक्त जमिनीचे भूसंपादन झाले नसल्याने शेतकऱ्यांनी दोन दिवसांपूर्वी काम थांबवले होते. यासंदर्भात नेरळ पोलीस ठाण्यात प्रभारी अधिकारी राहुल वारोटे यांच्या सूचनेनुसार बैठक झाली. यावेळी एमएसआयडीसीचे कार्यकारी अभियंता दिलीप हिंगे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंते राहुल देवांग, बी.आर. चव्हाण, भूषांत सिंग, तांत्रिक अधिकारी सुदीप यादव उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या वतीने माजी सभापती धोंडू राणे, निवृत्त अधिकारी सूर्यकांत चंचे, विशाल गायकर, स्वप्नील जामघरे, दशरथ कालेकर, दत्ता चंचे, मारुती कालेकर, भगवान कालेकर, संतोष कालेकर, मोतीराम हाबले, प्रदीप कालेकर, अनिल शिंदे आदींनी बाजू मांडली. भूसंपादन झाले असल्याचे कागदपत्र दाखवा आणि मगच अतिरिक्त काम करा, अशी मागणी त्यांनी केली. रात्रीच्या वेळी काम करणे आणि रस्त्यावर पुरेसे पाणी न मारणे याबाबतही तक्रारी करण्यात आल्या. कार्यकारी अभियंता हिंगे यांनी गाव नकाशात रस्ता दर्शविल्याचे सांगितले; मात्र भूसंपादनाचे पुरावे सादर करता आले नाहीत. त्यामुळे महसूल विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय आणि भूमी अभिलेख विभागाकडून भूसंपादनाची माहिती मागविण्याचे आश्वासन देण्यात आले. आठ दिवसांत कागदपत्रे उपलब्ध न झाल्यास पुन्हा रस्ता रोको करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला.
कायदेशीर भूसंपादन करा
पूर्वीचा साडेतीन मीटरचा रस्ता असल्याने त्याबाबत आमची तक्रार नाही. मात्र, आता त्यापुढे जाऊन रुंदीकरण आणि काँक्रिटीकरण केले जात आहे. त्यासाठी आमच्या जमिनींचे कायदेशीर भूसंपादन करून शासनाकडे प्रस्ताव पाठवावा. भूसंपादनाशिवाय अतिरिक्त काम करू देणार नाही, अशी भूमिका शेतकऱ्यांनी मांडली.
