वासुंडे बौद्धवाडीत निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याच्या इशारा

सरपंचाचे आरक्षण सोडतीत अन्यायकारक बदल
। पाली/बेणसे । वार्ताहर ।
सुधागड तालुक्यातील माणगाव बुद्रुक ग्रामपंचायत अंतर्गत येणार्‍या वासुंडे बौद्धवाडीतील अनुसूचित जातीचे सरपंचाचे आरक्षण सोडतीत प्रभागनिहाय अन्यायकारक बदल झाल्याचे समोर आले आहे. या धोरणाला कडाडून विरोध दर्शवित आगामी सर्व निवडणुकांवर येथील ग्रामस्थांनी बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. माणगाव बुद्रुक ग्रामपंचायतीमध्ये 07 महसुली गावे, सहा आदिवासी कातकरी वाड्या, दोन धनगर वाड्या,1 बौद्धवाडी असा समावेश आहे, असे असताना बौद्धवाडीचा समावेश हा प्रभाग क्र 01 मध्ये आहे. अशातच सरपंच आरक्षण सोडतीत आरक्षण हे एस सी करीता आरक्षित ठेवण्यात आलेले आहे, मात्र बौद्ध वस्तीचा प्रभाग वगळून अन्य प्रभागात हे आरक्षण ठेवण्यात आले आहे, त्यामुळे बौद्ध समाजावर यातून अन्याय होत आहे, या मागचे षडयंत्र काय आहे , असा सवाल उपस्थित केला जात आहे. केवळ वासुंडे बौद्धवाडी नव्हे तर सुधागड तालुक्यातील 54 बौद्धवाड्या देखील अशा पद्धतीने आरक्षणातील अन्यायकारक होत असलेल्या बदलाच्या विरोधात एकवटतील असा इशारा अशोक कांबळे यांनी दिला आहे.

यावर्षीचे सरपंच पदाचे आरक्षण हे सन 2002 व सन 2017 प्रमाणेच बौद्ध वस्तीचा समावेश प्रभाग क्रमांक 01 मध्येच पडले पाहिजे अशी मागणी जोर धरत आहे. सदर आरक्षण जाहीर केल्यानंतर तक्रारदार ग्रामस्थांच्या प्रामुख्याने निदर्शनास आले की अन्य कोणत्याही प्रभागातील आरक्षण रोटेशन प्रमाणे फिरविले नाही. यामध्ये अनुसूचित जमाती व सर्वसाधारण यांचे आरक्षण जाहीर करताना कोणत्याही प्रकारचे रोटेशन फिरविले नसल्याचे समोर आले आहे.

या अन्यायकारक धोरणाचा सामाजिक कार्यकर्ते अशोक कांबळे, बालाराम साळुंके, भगवान वाघमारे, रमेश साळुंके, किरण साळुंके, सागर साळुंके, समीर कांबळे, भावेश साळुंके,चंद्रकांत वाघमारे, पंडित वाघमारे, प्रतीक साळुंके, राकेश साळुंके, मंगेश साळुंके, महेश साळुंके, शरद कांबळे, साधना साळुंके, प्रवीण साळुंके, राखी प्रवीण साळुंके, लता वाघमारे, अवसाबाई साळुंके, मनीषा साळुंके, आशा साळुंके, अंकिता कांबळे, सारिका साळुंके आदींसह ग्रामस्थांनी निषेध व्यक्त करून यासंदर्भातील लढा व्यापक करण्याचा इशारा दिला आहे.

वासुंडे ग्रामस्थांच्या तक्रारीच्या अनुषंगाने लवकरच बैठक घेऊन यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करू.

-दिलीप रायन्नावार, तहसीलदार पाली सुधागड

माणगाव बुद्रुक ग्रामपंचायतिमधील वासुंडे बौध्दवाडीच्या सरपंच आरक्षण सोडतीत झालेल्या प्रभाग बदलाबाबत ग्रामस्थांनी अपिलात जावे, याकरिता रायगड जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून सदर तक्रार निवारण करण्यासाठी आवश्यक तो प्रयत्न केला जाईल.

-आदिती तटकरे, पालकमंत्री रायगड
Exit mobile version