समतानगरजवळ लाखो लिटर पाण्याची नासाडी

नव्याने टाकलेली पाइपलाइन फुटली

| रसायनी | प्रतिनिधी |

उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागल्याने अनेक भागांमध्ये पाण्याची पातळी खालावत असून, पाणीटंचाईची चाहूल लागली आहे. रसायनी, पाताळगंगा तसेच आसपासच्या ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये पाणीटंचाई जाणवू लागली असतानाच समतानगर, बारवई परिसरात नव्याने टाकलेली पाण्याची पाईपलाईन फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया जात असल्याचा प्रकार समोर आला आहे.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत दांड येथून बारवई पुलाकडे नवीन पाण्याची पाईपलाईन टाकून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. मात्र, या पाईपलाईनचे काम पूर्ण होऊन अवघे दोन दिवसही झाले नसताना समतानगर, बारवई येथे लोखंडी पाईपलाईन फुटल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जात आहे. सध्या अनेक गावांना पाणीटंचाईची झळ बसत असताना अशी पाण्याची नासाडी होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. याकडे संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. लवकरात लवकर पाईपलाईन दुरुस्त करून पाण्याची नासाडी थांबवावी, अन्यथा येत्या काळात पाणीटंचाई अधिक तीव्र होण्याची शक्यता असल्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.

Exit mobile version