एमआयडीसी प्रशासन सुस्त
| पाली/बेणसे | वार्ताहर |
रायगडसह महाराष्ट्रात उन्हाळ्याच्या दिवसात भीषण पाणीटंचाईचे संकट ओढवले आहे. तर दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाची आंबेघर वेलशेत नजीक असलेली पाईपलाईन फुटून लाखो लिटर पाणी वाया जात आहे. पाण्याचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय होत असताना एमआयडीसी प्रशासन सुस्त असल्याने जनतेतून संताप व्यक्त होत आहे.
मार्च, एप्रिल व मे महिन्यात उन्हाळ्यात अनेक गावे, वाड्या वस्त्यांना पाणीटंचाईच्या झळा पोहचतात. तहानलेल्या गावातील नागरिक घोटभर पाण्यासाठी वणवण भटकतात. तर दुसऱ्या बाजूला एमआयडीसीतून पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटून हजारो लिटर पाणी वाया गेले. पाण्याचे उडणारे जोरदार फवारे जलद बंद व्हावेत यासाठी तात्काळ कोणतीही यंत्रणा त्याठिकाणी आलेली नाही, प्रत्येक वेळी या पाईपलाईन फुटतात, पाण्याचे तलाव साचतात.
सातत्याने अशाप्रकारे पाईपलाईन फुटून मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जाऊन राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान होते, मात्र संबंधित प्रशासन याकडे कानाडोळा करताना दिसतो, त्यामुळे हजारो लिटर पाणी वाया जात असल्याने पर्यावरण प्रेमी व जनतेतून संताप व्यक्त केला जातोय.