सावधान! ट्रेकिंगसाठी येताय तर काळजी घ्या

?

। नेरळ । प्रतिनिधी ।

मान्सूनचे आगमन होताच माथेरान या थंड हवेच्या ठिकाणी ट्रेकिंगसाठी येणार्‍या पर्यटकांची संख्या मोठी आहे. अनोळखी ठिकाणी ट्रेकिंगसाठी येणारे ट्रेकर्स काहीवेळा रस्ता भरकटत असतात. अशा ट्रेकर्स यांच्यासाठी माथेरान पोलीस ठाणे आणि सह्याद्री रेस्न्यू टीमकडून आवाहन करण्यात येत आहे.

पावसाळा सुरू झाल्यानंतर निसर्गाने नटलेल्या गड, किल्ले, धरण, धबधबे, डोंगर, माळरानावर पावसाचा आनंद घेण्याकरिता आणि ट्रेकींगसाठी प्लॅन तयार करीत असतात.ट्रेकिंग आणि पर्यटनासाठी येणार्‍या पर्यटक ट्रेकर्स यांच्याकडून प्रशासनाने दिलेल्या सूचनांचा विचार न करता आततायीपणा दाखवला जातो. त्यामुळे दुर्घटना टाळण्यासाठी माथेरान पोलिसांनी एक विशेष मोहीम सुरु केली असून, पर्यटकांच्या सुरक्षेसाठी आवाहन केले आहे.काही आपत्कालीन परिस्थिती उद्भवली आणि त्या ठिकाणी मोबाईल नेटवर्क नसेल तर पोलिसांना संपर्क साधता येईल. या सर्व गोष्टींचा विचार करून मगच माथेरानला ट्रेकींगसाठी यावे, असे आवाहनही माथेरान पोलिसांनी केले आहे. त्यामुळे माथेरानला येण्याअगोदर येथील पर्वतीय रस्ते व त्याच्या सुरक्षिततेची योग्य माहिती असणे गरजेचे असल्याचे आवाहन माथेरान पोलिसांनी केले आहे. ट्रेकींगला येताना भौगोलिक माहिती घेऊन सुरक्षित ट्रेकींगचे रस्ते निवडावे, असेही सांगण्यात आले आहे.

माथेरानच्या डोंगरातील विकटगड आणि गार्बेट प्लाटू या ठिकाणी ट्रेकिंगसाठी पर्यटक ट्रेकर्स येत असतात. त्याचवेळी माथेरान मध्ये येताना रामबाग पॉइंट तसेच धोधानी या भागातून येणार्‍या ट्रेकर्स यांनी माथेरान मधील भौगोलिक रचना आणि पायवाटा रस्ते यांची आधी माहिती घ्यावी, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे. माथेरानमध्ये आपत्कालीन स्थिती उद्भवल्यास दामोदर खतेले (माथेरान पोलीस ठाणे) 08379909:061 किंवा सुनील कोळी (माथेरानमधील सह्याद्री रेस्न्यू टीम) 07098333750 यांच्याशी संपर्क साधावा.

Exit mobile version