| उरण | प्रतिनिधी |
उरण तालुक्यात औद्योगिकीकरण आणि नागरीकरण झपाट्याने वाढत आहे. वाढत्या वाहतुकीचा ताण लक्षात घेऊन सार्वजनिक बांधकाम विभाग, जेएनपीए, सिडको, उरण नगर परिषद, रायगड जिल्हा परिषद तसेच स्थानिक ग्रामपंचायतींकडून लाखो-करोडो रुपये खर्च करून रस्त्यांचे डांबरीकरण व काँक्रीटीकरण करण्यात आले आहे. मात्र, नियोजनशून्य कारभारामुळे आजही तालुक्यातील अनेक रस्त्यांवर पावसाचे पाणी साचून राहत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
रस्त्यांवर पाणी साचण्यामागे अनेक कारणे असून, पावसाच्या पाण्यासोबत वाहून आलेला कचरा, प्लॅस्टिक आणि गाळ नाल्या व पाण्याच्या वाहिन्यांमध्ये अडकल्याने पाण्याचा निचरा थांबतो. तसेच रस्ते बांधताना योग्य उतार न दिल्यास पाणी रस्त्यावरच साचून राहते. वाढत्या अनधिकृत बांधकामांमुळे नैसर्गिक जलप्रवाह आणि गटारांचे मार्ग अडवल्यानेही ही समस्या गंभीर बनली आहे.
शहरीकरणामुळे मोठ्या प्रमाणात सिमेंटचे रस्ते निर्माण झाले असून, पाणी जमिनीत मुरण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्यातच जुनी ड्रेनेज व्यवस्था वाढत्या पाण्याचा भार पेलण्यास अपुरी ठरत आहे. साचलेल्या पाण्यामुळे वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पाण्याखालील खड्डे न दिसल्याने दुचाकी घसरणे, अपघात होणे तसेच वाहतूक कोंडी निर्माण होण्याचे प्रकार वाढत आहेत. यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग, जेएनपीए, सिडको, उरण नगर परिषद, रायगड जिल्हा परिषद आणि स्थानिक ग्रामपंचायतींनी आपल्या अखत्यारीतील रस्त्यांची तातडीने पाहणी करून पावसाचे पाणी रस्त्यावर साचणार नाही यासाठी योग्य उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
नियोजनशून्य कारभारामुळे रस्त्यावर साचले पाणी
