संरक्षक भिंतीचा पाण्याला अडथळा

नैसर्गिक मार्ग बंद; पाणी तुंबण्याची शक्यता

| उरण | वार्ताहर |

सोनारी व करळ ग्रामपंचायत हद्दीतील पावसाच्या पाण्याचा निचरा योग्य प्रकारे व्हावा यासाठी जेएनपीए बंदर व्यवस्थापनाने सदर ग्रामपंचायत हद्दीतील नाल्यांचे काम हाती घेतले आहे. परंतु, नाल्यांच्या संरक्षण भिंतीलगत पावसाच्या पाण्याचा निचरा योग्य प्रकारे व्हावा यासाठी ठिकठिकाणी पाईप किंवा इतर सुविधा उपलब्ध केलेली नाही. त्यामुळे संरक्षण भिंतीलगत पावसाचे पाणी अडून गाव परिसरात साचण्याचा धोका निर्माण झाला आहे, अशी ओरड रहिवासी व्यक्त करत आहेत.

जेएनपीए प्रकल्पबाधित सोनारी, करळ, सावरगाव, जसखार आणि फुंडे ग्रामपंचायत हद्दीत पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचून राहात आहे. त्यामुळे गाव परिसरातील नाल्यांच्या काठावरील रहिवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे उपरोक्त ग्रामपंचायत हद्दीतील नाल्यांचे काम जेएनपीए बंदर व्यवस्थापनाने हाती घ्यावे, अशी मागणी सातत्याने ग्रामपंचायत हद्दीतील रहिवाशांकडून करण्यात येत आहे. या मागणीची दखल जेएनपीए बंदर व्यवस्थापनाने घेऊन उपरोक्त चार ग्रामपंचायत हद्दीतील पावसाच्या पाण्याचा निचरा योग्य प्रकारे व्हावा यासाठी जेएनपीए बंदर व्यवस्थापनाने 2020 ते 22 या वर्षात सुमारे आठ कोटींचा निधी मंजूर करुन घेतला आहे.

परंतु जेएनपीए बंदर व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणामुळे सोनारी, जसखार, फुंडे ग्रामपंचायत हद्दीतील नाल्यांचे काम हे अत्यंत तकलादू झाले आहे. त्यातच सध्या सोनारी, करळ ग्रामपंचायत हद्दीत नाल्यांच्या संरक्षण भिंतीचे काम युद्धपातळीवर ठेकेदारांच्या माध्यमातून करण्यात येत आहे. परंतु, सदर ठेकेदारांनी सोनारी, करळ, सावरगाव गावातील नाल्यांच्या काठालगत सुरु असलेल्या संरक्षण भिंतीलगत पावसाच्या पाण्याचा निचरा योग्य प्रकारे व्हावा यासाठी ठिकठिकाणी पाईप किंवा इतर सुविधा उपलब्ध करून न ठेवल्याने पावसाचे पाणी अडून गाव परिसरात साचण्याचा धोका निर्माण झाला आहे.

तरी जेएनपीए बंदर व्यवस्थापनाने सोनारी, करळ, जसखार आणि फुंडे ग्रामपंचायत हद्दीतील नाल्यांच्या कामांची पाहणी करून ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी सोनारी, करळ, सावरगाव गावातील रहिवासी करत आहेत.

Exit mobile version