60 पेक्षा अधिक रुग्णांवर उपचार सुरु
| उरण | वार्ताहर |
जेएनपीए बंदर प्रशासन, उरण पंचायत समिती आणि स्थानिक ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षितपणामुळे सोनारी ग्रामपंचायत हद्दीतील रहिवाशांना अनेक समस्यांनी ग्रासले आहे. त्यात गावात मोठ्या प्रमाणात डासांचा प्रादुर्भाव वाढत असल्याने मागील वर्षापासून येथील रहिवाशांना ताप, मलेरिया, डेंग्यू सारख्या आजाराचा सामना करावा लागत आहे. त्यात सध्या पावसाळ्यापूर्वी चिकनगुनिया सारख्या आजाराचा प्रादुर्भाव वाढत असल्याने गावातील सुमारे 60च्या वर रहिवासी खासगी रुग्णालयात उपचार करुन घेत असल्याचे चित्र समोर आले आहे. ही परिस्थिती अशीच राहिली तर सोनारी गाव चिकनगुनियाचा आशियाना बनेल, अशी भिती रहिवाशी व्यक्त करित आहेत.
जेएनपीए बंदराकडून करोडो रुपयांचा मालमत्ता कर मिळणारी उरण तालुक्यातील सोनारी ही एक गर्भश्रीमंत ग्रामपंचायत आहे. मात्र, जेएनपीए बंदर प्रशासन, रायगड जिल्हा परिषदेचे अधिकारी, उरण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी वर्गाच्या दुर्लक्षित पणामुळे या ग्रामपंचायत हद्दीतील रहिवाशांना अनेक नागरी समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यात तुंबलेली गटारे, साठवून ठेवलेल्या पाण्याच्या साठ्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढत आहे. डास हे रहिवाशांना चावत असल्याने मलेरिया, डेंग्यू सारखे रुग्ण ग्रामपंचायत हद्दीत या अगोदर ही आढळून आले आहेत. त्यात सध्या पावसाळ्यापूर्वी चिकनगुनिया सारख्या आजाराचा प्रादुर्भाव वाढत असल्याने गावातील सुमारे 60च्या वर रहिवासी हे खासगी रुग्णालयात उपचार करुन घेत असल्याचे चित्र समोर आले आहे. ही परिस्थिती अशीच राहिली तर सोनारी गाव चिकनगुनियाचा आशियाना बनेल, अशी भिती रहिवाशी व्यक्त करत आहेत. मात्र, तालुका आरोग्य विभाग या संदर्भात ठोस उपाययोजना करत नसल्याने रहिवाशांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे.
डासांवर कसं नियंत्रण ठेवावं
चिकनगुनिया हा डासांमुळे होणारा विषाणूजन्य आजार आहे. या आजारात ताप येतो. तीव्र सांधेदुखी होते. हा आजार एडिस डासांद्वारे पसरतो. त्यामुळे या आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी पाणी साठवून ठेवलेली टाकी व बॅरल वेळोवेळी रिकामे करून स्वच्छ ठेवावीत. डासांची वाढती उत्पत्ती रोखण्याकरिता कीटकनाशके फवारावी. डासांपासून संरक्षण करण्याकरिता पुरेसे कपडे परिधान करावेत. तसेच, डासांना घरात प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी खिडक्या आणि दारांना पडदे लावावेत.
चिकनगुनियाचे रुग्ण काही अंशी आढळून आले आहेत. गावातील गटारांची साफसफाई केली जात असून वेळोवेळी औषधांची फवारणी ही केली जात आहे. सध्या जेएनपीए बंदराकडून मुख्य नाल्याची साफसफाई करण्याचे काम सुरू आहे.
विनोद मोरे,
ग्रामपंचायत अधिकारी, सोनारी ग्रामपंचायत