| पनवेल | वार्ताहर |
कारने आपल्या घरी जात असलेल्या तरुणाला चौघा अज्ञात लुटारूने रस्त्यात अडवून त्याला लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून त्याच्याजवळ असलेली सोन्याची चेन व इतर ऐवज लुटून पलायन केल्याची घटना उलवेमध्ये घडली. विनय जितेंदर कुमार (29) असे लुटण्यात आलेल्या तरुणाचे नाव असून, तो उलवे सेक्टर-21 मध्ये राहतो.
मिळालेल्या माहितीनुसार, विनय हा पहाटे सव्वादोन वाजण्याच्या सुमारास त्याच्या कारने उलवे येथील घरी जात होता. यावेळी अज्ञात चौकडीने उलवे सेक्टर-21 येथे त्याची कार अडवून त्याला कारमधून बाहेर खेचले व त्याला लोखंडी रॉड व लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. त्यानंतर त्यांनी विनय कुमार याच्या गळ्यातील सोन्याची चेन खेचली तसेच त्याचा मोबाईल व पॉकेट काढून घेतले, त्याच्या कारच्या काचा फोडून तेथून पलायन केले. या प्रकारानंतर जखमी विनय कुमार अपोलो हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी या घटनेची माहिती मिळताच त्यांनी रुग्णालयात जाऊन विनयचा जबाब नोंदवून घेतला आहे. त्यानंतर त्याला मारहाण करून लुटणार्या अज्ञात चौकडीविरोधात गुन्हा नोंद केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.