| पनवेल | वार्ताहर |
पनवेलच्या चिंचपाडा भागात राहणार्या एका तरुणाने व त्याच्या तीन साथीदारांनी किरकोळ कारणावरून करंजाडे भागात राहणार्या तरुणावर प्राणघातक हल्ला करून पलायन केल्याची घटना शनिवारी, 31 मे रोजी दुपारी घडली. पनवेल शहर पोलिसांनी या प्रकरणातील चौघा मारेकर्यांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांपैकी एकाला अटक केली आहे. या मारहाणीत जखमी तरुणावर एमजीएम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
चैतन्य म्हात्रे (26) असे मारहाण करण्यात आलेल्या तरुणाचे नाव असून, तो करंजाडे येथील शंभुराजे अपार्टमेंटमध्ये कुटुंबासह राहतो. शनिवारी दुपारी चैतन्य कामावरून जेवण करण्यासाठी घरी आला होता. या वेळी त्याला इमारतीच्या पायरीवर चिंचपाडा भागात राहणार्या कुणाल ढमाले (20) हा बसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे चैतन्य याने कुणाल याला तू विनाकारण आमच्या इमारतीत का बसतोस, अशी विचारणा केली. याचा कुणालला राग आल्याने त्याने चैतन्यला उद्देशून मी कोण आहे हे तुला माहीत आहे का?, मी गाववाला आहे, मी चिंचपाडा येथे राहतो. मी काहीही करेन, असे बोलून तो तेथून निघून गेला. त्यानंतर काही वेळाने तो त्याच्या तीन साथीदारांसह हातामध्ये बॅट आणि लाकडी दांडके घेऊन इमारतीत पुन्हा आला. या वेळी चैतन्य जेवण करून कामावर जाण्यासाठी इमारतीच्या खाली आला असताना, कुणाल व त्याच्या तीन साथीदारांनी त्याच्यावर बॅटने, लाकडी दांडक्यांनी प्राणघातक हल्ला करून त्याला जखमी केले.