लाखो रुपये खर्चून कालव्यांची सफाई, मात्र कालवे मूळ स्थितीत
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्याचा पूर्व भाग हिरवागार करणार्या राजनाला कालव्यात पाणी सोडण्यात आले आहे. परिसरातील 32 गावे ओलिताखाली आणणार्या राजनाला कालव्यात पाणी सोडण्याआधी पाटबंधारे विभागाने लाखो रुपये कालव्यांची दुरुस्ती आणि साफसफाई करण्यासाठी खर्च केले आहेत. दरम्यान, कर्जत पाटबंधारे विभाग शेतकर्यांना पाणी वेळेवर द्यायचे आहे या नावाखाली कालव्यांची साफसफाई मोहीम हाती घ्यावी लागली असल्याचे सांगत साफसफाई करण्याच्या कामाकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे.
पाटबंधारे विभाग कर्जत यांच्या अखत्यारीत कर्जत राजनाला कालवा असून, या कालव्यांचे पाणी कर्जत तालुक्याच्या पूर्व भागातील 32 गावांना दिले जाते. मुख्य कालवा, पोटल कालवा, जांभीवली गौरकामत कालवा आणि मांडवणे कालव्यामधून शेतीसाठी पाणी सोडण्यात येते. या सर्व कालव्यांची लांबी साधारण 25 किलोमीटर एवढी आहे. मागील काही वर्षांपासून जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राजनाला कालव्याला पाणी सोडले जाते. मात्र, कालव्यात पाणी सोडण्यासाठी या कालव्यांची दुरुस्तीची कामे ऑक्टोबर, नोव्हेंबर या कालावधीत केली जात असतात. त्या कालव्यांची दुरुस्ती आणि साफसफाई ही आवश्यकतेनुसार यांत्रिकीकरण यांच्या माध्यमातून केली जाते. त्यासाठी लाखो रुपयांच्या निधीची तरतूद दरवर्षी केली जाते. मात्र, राजनाला कालव्यात वाढलेले गवत आणि पडलेल्या खांडी यावर्षीदेखील कालव्यात पाणी सोडल्यानंतर कायम आहेत.त्यामुळे नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात पाटबंधारे विभागाने कोणत्या ठिकाणी कालव्यांची साफसफाई मोहीम हाती घेतली, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहेत.
राजनाला कालवा परिसरातील कालव्यांची त्यांच्यामध्ये पाणी सोडल्यानंतर स्थिती पाहिली असता बहुसंख्य ठिकाणी कालव्यांची स्वच्छता करण्यात आलेली नाही, असे दिसून येत आहे. सिमेंटच्या कालव्यांच्या आजूबाजूला झाडेझुडुपे काढण्यासाठी लाखो रुपयांचा खर्च केला आहे. तरीदेखील कालव्यांच्या बाजूला झाडेझुडुपे कायम आहेत. त्यामुळे पाटबंधारे विभागाने कालव्यांची स्वच्छता साफसफाई कुठे केली, असा प्रश्न स्थानिक शेतकरी विचारत आहेत. त्याचवेळी पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांच्याकडे कालवे साफसफाई केले जात असताना लावलेल्या मशिनरी यांचे व्हिडीओ मागितले असता ते उपलब्ध केले जात नाहीत. त्यामुळे कालव्यांच्या साफसफाईमध्ये पाटबंधारे विभाग यांच्याकडून मोठा गैरव्यवहार केला असल्याचा आरोप होऊ लागला आहे. कर्जत तालुक्याच्या पूर्व भागातील राजनाला कालव्याच्या बहुतेक ठिकाणी हीच परिस्थिती असल्याने शेतकरी संतप्त आहेत.साफसफाई व्यवस्थित न केल्यामुळे कालव्यात पाणी पुढे जाण्यात अडचणी येत आहेत.त्याचवेळी कालव्यांची दुरुस्ती व्यवस्थित केली नसल्याने कालव्यातून वाहून जाणारे पाणी मध्येच शेतीमध्ये घुसून नुकसान करीत आहे.
त्याबाबत पाटबंधारे विभागाचे उपअभियंता हे निवृत्त झाल्याने शाखा अभियंता यांच्याकडे पदभार देण्यात आला आहे. प्रभारी असलेले अधिकारी यांची भेट शेतकर्यांना कार्यालयात होत नाही. त्याचवेळी दुसरे शाखा अभियंता मेंगाळ यांना संपर्क केला असताना प्रभारी अधिकारी पारधी जे तुम्हाला माहिती देतील, असे शेतकर्यांना सांगितले जात आहे. त्यामुळे कालव्यांचा गोंधळ शेतकर्यांच्या शेतीचे नुकसान करणारा ठरत आहे.
40 किलोमीटरचे कालवे
राजनालामध्ये 21 किलोमीटर लांबीचे मुख्य कालवे असून, 19 किलोमीटर लांबीचे पोटकालवे आहेत. पोटकालव्यातील दोन कालवे हे बंद असून, अन्य कालव्यांमध्ये पाणी सोडण्यात आले आहे.