| म्हसळा | वार्ताहर |
विजेचा शॉक लागून देहन नर्सरी येथील कृषी पर्यवेक्षक राजेंद्र सुखदेव मांडवडे (57) यांचा बुधवारी (दि.15) सायंकाळी 5.30 च्या सुमारास दुर्दैवी मृत्यू झाला. मजूर प्रकाश देवजी गिजे (55) यांनी दिलेल्या तक्रारीवरून म्हसळा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. घटनेचे वृत्त कळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कहाळे, सब इन्स्पेक्टर सुनील रोहीनकर, सुरेश पालोदे, पो. शिपाई संतोष चव्हाण, पो. हवालदार रामचंद्र बांगर, बाबासाहेब बोंगाणे यांनी 108 रुग्णवाहिकेसह घटनास्थळी दाखल झाले. मांडवडे यांना उपचारासाठी तात्काळ ग्रामीण रुग्णालय म्हसळा येथे दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. निखिल सहाणे यांनी त्यांना मृत घोषित केले. मांडवडे हे देहेन रोपवाटिकेत रोपांना वीज पंपाने पाणी सुरु करीत असताना विजेचा धक्का लागल्याने दुर्घटना घडली. मांडवडे हे गेले अनेक वर्षे म्हसळा तालुका कृषी विभागात आणि फळरोपवाटिका देहेन येथे कार्यरत असल्याने म्हसळा-देहेन ग्रामस्थांवर शोककळा पसरली आहे. मांडवडे मूळचे नाशिक जिल्ह्यातील रहिवासी आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असे कुटुंब आहे.