पंचायत समिती अंतर्गत कामे कूर्मगतीने
| तळा | वार्ताहर |
जिल्हा प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे गेल्या एक वर्षापासून तळा पंचायत समितीमध्ये प्रभारी बीडीओंचेच राज आहे. तिसर्यांदा प्रभारी बीडीओ म्हणून महादेव शिंदे यांनी पदभार स्वीकारला आहे. त्यामुळे या पंचायत समिती अंतर्गत विकासकामे, शासकीय कामे कासवगतीने सुरू आहेत.
पंचायत समिती गटविकास अधिकारी हे महत्त्वाचे पद आहे. मात्र, हे पद प्रभारींवर सोपविण्यात आले आहे. याआधीची श्री. परदेशी, श्री. यादव, श्री. बोंगे यांची कारकीर्द सोडली, तर या पंचायत समितीला आजपर्यंत नियमित अधिकारी लाभला नाही. कुलदीप बोंगे यांची बदली झाल्यानंतर काही महिने माणगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी म्हणून श्री. जठार यांच्याकडे काही महिने प्रभारी पदभार देण्यात आला होता. त्यानंतर मुरुड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री. खताळ यांच्याकडे प्रभारी पदभार दिल्यानंतर महिनाभरातच त्यांच्याकडील पदभार काढून, आता रोहा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी महादेव शिंदे यांच्याकडे प्रभारी गटविकास अधिकारी म्हणून जवाबदारी देण्यात आली आहे.
पंचायत समितीचा ग्रामसेवक, शिक्षक, आरोग्य अधिकारी, विस्तार अधिकारी मुख्यालयी म्हणजे तळा तालुक्यात राहात नाही. कार्यालयातील थंब इंप्रेशन मशीन बंद आहे, अनेक खेटे मारुनदेखील जनतेची कामे पूर्ण होत नाहीत, घरकुलांचे पैसे जमा होत नाहीत, पाणीपुरवठा अधिकारी यांच्या वारंवार पं.स.मध्ये आढावा बैठक घेऊनसुद्धा योजना अर्धवटच आहेत, ग्रामपंचायत स्तरावर 14 व्या वित्त आयोगाची रक्कम ग्रामसेवकांनी कुठे खर्च केली? हा तर संशोधनाचा विषय ठरला आहे.
रोजगार हमी योजना अधिकारी पंचायत समितीमध्ये काय करतात, असा प्रश्न निर्माण झाला असताना नवनिर्वाचित प्रभारी गटविकास अधिकारी महादेव शिंदे कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी वर्गावर नियंत्रण ठेवून सर्वसामान्य नागरिकांना अपेक्षित असणारे प्रशासन चालवणार का? याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.