कालवलीच्या जनसहभागातील पाणीयोजनांची आदर्शवत कल्पकता
। पोलादपूर । प्रतिनिधी ।
ग्रामीण भागातील नळपाणीपुरवठा योजना विद्युतबिलांच्या थकबाकीमुळे बंद पडत चालल्या असताना कालवली येथील सामाजिक कार्यकर्ते अब्दुलहक खलफे यांच्यामुळे जनसहभागातील पाणीयोजना सरकारी योजनांसाठी आदर्शवत ठरत असून खलफे यांच्या कल्पकतेमुळे योजना हायटेक देखील होऊ लागल्या आहेत.
सध्या पाणीपुरवठा योजनांचे मोटरपंप सुरू अथवा बंद करण्यासाठी जीपीआरएस पद्धतीचा वापर केला जात असून मोबाईलद्वारे एका सीमकार्डच्या साहाय्याने नंबर डायल करताच हा मोटारपंप सुरू होतो तसेच मोबाईलद्वारेच पुन्हा हा मोटारपंप बंद करता येत असल्याचे प्रात्यक्षिक यावेळी अब्दुलहक खलफे यांनी दाखविले. यावेळी त्यांनी कालवली गावातील विठ्ठलवाडी, भोसलेवाडी आणि पवारवाडी या लोकवस्त्या दूर्गम डोंगराळ भागामध्ये असल्याने त्यांच्यासाठी पाणी उपलब्ध करून देणे शक्य होत नसल्याची खंतही सामाजिक कार्यकर्ते अब्दुलहक खलफे यांनी प्रस्तुत प्रतिनिधीजवळ बोलताना व्यक्त केली.
सामाजिक कार्यकर्ते अब्दुलहक खलफे यांच्या कल्पनाशक्तीला कालवलीचे सरपंच शांताराम महाडीक यांनी सहकार्याची भुमिका घेतल्याने कालवली गावातील चार वाडयांमधील असंख्य ग्रामस्थांना घरामध्ये मुबलक पाणी अत्यल्प खर्चामध्ये उपलब्ध होत आहे. पोलादपूर तालुक्यासह राज्यातील अनेक गावांमध्ये विद्युतबिले अवाजवी आल्याने थकीत बिलांमुळे तसेच लोकवर्गणी न जमल्याने शासनाचा पैसा वाया घालवित बंद पडणार्या नळपाणीपुरवठा योजना पाहता केवळ दीड लाखांपर्यंत खर्च आणि कमी विद्युत बिलांमुळे सहज परवडणार्या छोट्या स्वरूपाच्या पाणीयोजना गावोगाव तसेच वाडया वस्त्यांसाठी उपयुक्त तसेच आदर्शवत ठरणार असल्याचे यावेळी अब्दुलहक खलफे यांनी सांगितले.