भिसेगाव रस्त्यावर जलवाहिनीचे खड्डे

15 दिवसात कोणतीही कार्यवाही नाही

। नेरळ । प्रतिनिधी ।

कर्जत नगरपरिषद हद्दीमधील गुंडगे ते भिसेगाव या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात झाडे रस्त्यावर कलंडली आहेत. त्याचवेळी पालिकेने ठिकठिकाणी जलवाहिन्या खोदून ठेवल्या आहेत. त्यामुळे या सर्व प्रश्‍नांवर मार्ग काढावा आणि वन विभागाने तेथील झाडांचा प्रश्‍न निकाली काढावा, अशी मागणी करणारे निवेदन अ‍ॅड. भावना मोरे यांनी दिले आहे.

कर्जत नगर परिषद हद्दीतील गुंडगे रोड जुने एसटी स्टॅण्ड परिसरात रहाणार्‍या माजी नगरसेविका पुष्पा दगडे यांच्या घराच्या समोर गेले 15 दिवसांपासून जलवाहिनी खोदून ठेवली आहे. पाईप लाईन शोधण्यासाठी गुंडगेकडे जाणारा वाहतुकीचा मुख्य रस्ता फोडून ठेवला आहे. या रस्त्यावर फॉरेस्ट ऑफिस, गुड शेफर्ड इंग्रजी शाळा, त्याचप्रमाणे अनेक रहिवासी राहातात. अनेक चारचाकी व दोन चाकी वाहने या रस्त्यावरून ये-जा करतात. रात्रीच्या वेळी वाहन चालकाला खड्डा समजून न आल्यास अपघात होवून जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यातच पाईप लाईनमध्ये कोठे समस्या आहे. याची माहिती नसल्याने या परिसरात पाण्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

तर याच भागात रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात झाडे रस्त्याकडे कलंडली आहेत. त्यात प्रामुख्याने बांबूच्या जातीची झाडे रस्त्याकडे आली असल्याने तेथील एका रस्त्यावरील प्रवास बंद झाला आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी अपघात होण्याची शक्यता आहे.

विशेष म्हणजे वन विभागाच्या कार्यलयाच्या अजूबाजूला हि झाडे रस्त्याकडे आली आहेत. ती सर्व झाडे तोडण्यात यावीत, अशी मागणी निवेदन देऊन केली आहे.

Exit mobile version