| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत नगरपरिषद हद्दीमधील कर्जत चारफाटापासून भिसेगाव नाका येथील रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम गेली चार महिने बंद आहे. पाचशे मीटर लांबीचा हा रस्ता असून त्या रस्त्यावरील काँक्रिटीकरणाचा एक भाग पूर्ण झाला असून दुसर्या भागाचे काम सुरु करण्यात आले नाही. ते तातडीने पूर्ण करावे,अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते आमोद कुलकर्णी यांनी दिला आहे.
दरम्यान, रस्ता गेली अनेक महिने काम सुरु अशा अवस्थेत असल्याने त्या रस्त्याने एसटी गाड्यांची वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत.
नगर परिषद हद्दीतील भिसेगाव येथील श्रद्धा हॉटेल ते चारफाटा या रस्त्यासाठी एम.एम.आर.डी.ए.च्या माध्यमातून तब्बल 4 कोटी 95 लाखांचा निधी उपलब्ध होऊन वर्क ऑर्डर सुद्धा निघाली आहे. अनेक वेळा पत्रव्यवहार करून एक बाजूचा रस्ता केला व त्या कामाचे बिल नगरपरिषदेने काढले. मात्र दुसर्या बाजूचा रस्ता तयार करायचा म्हणून खोदून ठेवला पण प्रत्येक्षात बांधकाम सुरु झालेले नाही. जर आगामी 15 दिवसात रस्त्याचे काम सुरु केले नाही तर आंदोलन छेडून नगरपरिषदेच्या नावाचा पुतळा जाळण्यात येईल असा इशारा माहिती अधिकार कार्यकर्ते आमोद कुलकर्णी यांनी दिला आहे.
रस्ता काँक्रिटचा तयार करण्यासाठी फक्त खोदून ठेवला आहे, पण प्रत्यक्षात दुसर्या बाजूचा रस्ता तयार करण्याचे कामाला सुरुवात नाही. त्यामुळे भिसेगाव-गुंडगे मधील नागरिकांना कर्जतला येण्यासाठी भिसेगावच्या खिंडीमधून बाहेर पडणारा चौक मार्गी निघणार्या रस्त्यावरून कर्जतमध्ये यावे लागते. तसेच नवरात्रौउत्सव गेला आता दिवाळी सण आला असल्याने महिलांना मंदिरात भिसेगाव देवीचे दर्शन घेण्यासाठी लांबून वळसा घालून यावे लागत आहे. तसेच बाजारहाट करण्यासाठी खिंडीमधून अथवा खडतर रस्त्यावरून रेल्वे पटरी ओलांडून यावे लागते आहे. त्यामुळे रस्त्याचे काम वेळेत झाले पाहिजे अशी मागणी नगरसेवक सोमनाथ ठोंबरे यांनी नगरपरिषदेला केला आहे.