81 एकर जमीन ओलिताखाली येणार; 160 ग्रामस्थांचा उपक्रमात सहभाग
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यात मुंबई येथील युनायटेड वे या संस्थेकडून आदिवासी आणि ग्रामीण भागात जलसंजीवनी प्रकल्प राबविला जात आहे. या उपक्रमांतर्गत क्रिसिल फाऊंडेशनच्या मदतीने चार ठिकाणी नदी- नाले यांच्यात सिमेंट बंधारे बांधण्यात आले आहेत. या सर्व बंधाऱ्यांची लोकार्पण सोहळा युनायटेड वे कडून करण्यात आला. पाणी साठवण करण्याच्या दृष्टीने तीन जलसंचरण बंधारे आणि एक कोरवाल बंधारा असे चार बंधारे बांधले असून, त्या बंधाऱ्यांमध्ये साठलेल्या पाण्याचा फायदा 81 एकर जमीन ओलिताखाली आणण्यासाठी मदत होईल असा अंदाज आहे.
युनायटेड वे मुंबई संस्था कार्यान्वयित आणि क्रिसिल फाउंडेशनच्या अर्थसहाय्याने जलसंजीवनी प्रकल्प अंतर्गत एकूण चार जल संरचना (बंधारे) ज्यात तीन स्टॉप डॅम आणि एक कोरवाल बांधण्यात आले असून, एकूण 81 एकर क्षेत्र लागवडीखाली येणार असून त्याच्या देखभाल व दुरुस्तीसाठी एकता जल उपयोगिता समूह स्थापित करण्यात आला आहे. सदर जल संरचनेचा हस्तांतरण कार्यक्रम पाथरज ग्रामपंचायत येथील डोंगरपाडा गावात असंख्य शेतकऱ्यांच्या उपस्थितीत झाला. क्रिसिल संस्थेचे प्रतिनिधी ज्योती कंदन, मनी कंदन, युनायटेड वे मुंबई संस्थेचे अजय गोवले, रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक राजेश मेचकर, समीर करटूले, आश्रम शाळेचे मुख्याध्यापक बनसोडे विविध बचत गटाच्या महिला, शेतकरी उपस्थित होते. या प्रसंगी पाथरज ग्रामपंचायत प्रतिनिधी नामदेव वारघडे यांच्याकडे जल संरचना हस्तांतरण पत्रक सुपूर्द करण्यात आले. ज्या शेतकऱ्यांनी बंधारा बांधण्यासाठी आपल्या जमिनीची जागा दिली आणि सहकार्य केलं त्यांचा गौरव करण्यात आला.
युनायटेड वे मुंबई, जल संजीवनी प्रकल्पाचे मंगेश बोपचे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना मांडली. सदर कार्यक्रमात लाभार्थी शेतकरी अतुल लोहकरे, समीर करटूले यांनी आपले मनोगत व्यक्त केले. क्रिसिल फाउंडेशनच्या ज्योती यांनी युनायटेड वे संस्थेचे कौतुक केले आणि सहकार्य केल्याबद्दल समाधान व्यक्त केले. युनायटेड वे मुंबई संस्थेचे प्रतिनिधी विवेक कोळी यांनी कार्यक्रमाचे सूत्र संचालन केले. या कार्यक्रमा प्रसंगी एकूण 160 ग्रामस्थांनी उपक्रमात सहभाग घेतला आहे. उभारण्यात आलेल्या चार बंधाऱ्यांमुळे उन्हळ्यात वेगवेगळी पिके घेणारी शेती शेतकऱ्यांना करता येणार असल्याने जनसंजीवनी प्रकल्पाचे कौतुक होत आहे.
पाणी पातळी वाढणार
बंधाऱ्यामुळे अनेक शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. रब्बी पिके तसेच भूजल पातळीत मोठी वाढ होत आहे. अनुक्रमे भूजल पातळीतील वाढ पाणीटंचाईच्या काही दिवसांसाठी मात करणारी आहे







