आंबेवाडी ते निवी कालव्याचे पाणी पेटणार

आक्रमक ग्रामस्थ अखेर आत्मदहनाच्या पवित्र्यात ; आम्हाला कोणतीच चर्चा नकोय, तहसीलदारांना ठणकावले


| धाटाव | वार्ताहर |

गेल्या कित्येक महिन्यांपासून सुरू असलेला आंबेवाडी ते निवी कालव्याचा पाणीप्रश्न अद्याप सुटलेला नाही. कालव्याची दुरुस्ती, पाणी सोडण्याचे आश्वासन यापलीकडे आजवर प्रशासन गेलेला नाही. पाण्यासाठी विभागीय ग्रामस्थ 2017पासून लढत आहेत. आंदोलन, मोर्चा, आमरण उपोषण करण्यात आले. त्यावर तारीख पे तारीख पाणी सोडण्याचे आश्वासन दिले. अनेकदा बैठका झाल्या, पण आज मार्चच्या प्रारंभीही कालव्याची प्रत्यक्ष दुरुस्ती नाही. त्यामुळे कालव्याला पाणी सोडणार कधी, असा सवाल पुन्हा उपस्थित झाला. पाटबंधारे प्रशासन मुख्यतः लोकप्रतिनिधी कालव्याच्या पाण्याबाबत गंभीर नाहीत. अखेर सहनशीलता संपल्याने विभागीय ग्रामस्थ बळीराजा फाऊंडेशनच्या नेतृत्वाखाली प्रचंड आक्रमक झाले आहेत.

कालव्याला पाणी न सोडल्यास 1 एप्रिल रोजी पाटबंधारेच्या कोलाड धरणात आत्मदहन करण्याचा गंभीर पावित्रा ग्रामस्थांनी घेतल्याने एकच खळबळ उडाली. तसे निवेदन मंगळवारी ग्रामस्थांनी तहसीलदार रोहा, पाटबंधारेचे उपकार्यकारी अभियंता यांना दिले. त्यामुळे आंबेवाडी ते निवी कालव्याचा पाणीप्रश्न पेटणार हे समोर आले. ग्रामस्थांनी पाण्यासाठी अखेर आत्मदहनाचा मार्ग स्वीकारल्याने लोकप्रतिनिधी करतात काय? ग्रामस्थांवर ही वेळ का आली? असा सवाल आता उपस्थित झाला आहे.

दरम्यान, ग्रामस्थांनी मंगळवारी तहसीलदार किशोर देशमुख, पाटबंधारेचे उपकार्यकारी अभियंता अतुल आगवणे यांना दि. 1 एप्रिल रोजी आत्मदहन करणार असल्याचे निवेदन दिले. यावेळी बळीराजा फाऊंडेशनचे उपाध्यक्ष ॲड. दीपक भगत, तुकाराम भगत, अनिल बामुगडे, राजेंद्र जाधव, प्रशांत राऊत, अंतोष शिर्के, रुपेश साळवी, चंद्रकांत शेळके उपस्थित होते.

आत्मदहन करण्याचा इशारा दिल्याने सबंध जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. आम्हा ग्रामस्थांची क्रूर चेष्टा सुरूच ठेवल्याने आम्ही हा अखेरचा पवित्र घेतला. पुढील होणाऱ्या परिणामांना आपण जबाबदार असाल, अशी संतप्त भावना सचिव ॲड. दीपक भगत यांनी व्यक्त केली. आम्हाला कोणतीच चर्चा करायची नाही. पाण्यासाठी आमची आंदोलने बघा, भूमिका बघा, त्यामुळे आम्हाला आता चर्चा नकोत, प्रशासनाला आमचा बळी हवा असेल तर आम्ही देतो, असे ग्रामस्थांनी तहसीलदारांना ठणकावून सांगितले. प्रशासन आता काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Exit mobile version