कुंडलिका पुलावर पाणीच पाणी; प्रवाशांची तारेवरची कसरत

। कोलाड । वार्ताहर ।
मुंबई-गोवा महामार्गावरील कुंडलिका नदीवरील दोन्ही पुलांवर तलावाचे स्वरूप निर्माण झाले असून, पुलावर सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. या पुलावरील पाण्यात भयानक खड्डे पडले आहेत. हे खड्डे पुलावर साचलेल्या पाण्यामुळे दिसत नसल्यामुळे मार्ग काढताना वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत असून, याकडे बांधकाम खाते डोळेझाक करीत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.

आठ ते दहा दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाला दमदार सुरुवात झाली आहे. मुंबई-गोवा महामार्गावर कुंडलिका नदीवरील नवीन बांधण्यात आलेल्या दोन्ही पुलांवर पाणीच पाणी साचल्यामुळे तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभाराचा नमुना दिसून येत असल्याचे बोलले जात आहे. पुलांच्या दोन्ही बाजूला पाणी जाण्यासाठी पाईप ठेवलेले आहेत; परंतु सर्वच पाईपाच्या बाजूला उंचवटा केल्यामुळे पुलाचा रस्ता खाली व पाईप वर राहिल्याने पाणी जाण्यासाठी जागाचा नाही.

मुंबई-गोवा महामार्गालगत अनेक पर्यटन स्थळे, शाळा, कॉलेज, पॉलिटेक्निकल कॉलेज असून, या पुलावरून असंख्य वाहने, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक ये-जा करीत असतात. शनिवारी तर चार ते पाच विद्यार्थी या पुलावरून शाळेत जात असताना त्यांच्या अंगावर वाहनामुळे पाणी उडून आंघोळच झाली. यामुळे या विद्यार्थ्यांना घरी परतावे लागले. कोलाड परिसतील कुंडलिका नदीवरील दोन पूल व महिसदरा नदीवरील पूल यांची अवस्था अतिशय बिकट झाली असून, यावरून प्रवास करताना प्रवाशांना आपला जीव मुठीत घेऊन जावे लागत आहे.

डांबरमिश्रित खडीने हे खड्डे भरत नसतील, तर यामुळे प्रचंड पडलेल्या खड्ड्यांचा भाग पुन्हा उखडून सिमेंट काँक्रिटने भरावे. शासनाचा कारभार नियोजनशून्य असल्यामुळे या कामाची प्रगती तर दूरच; परंतु नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. मोठा अपघात घडला तर याला जबाबदार कोण?

राजेश शिर्के, सामाजिक कार्यकर्ते



Exit mobile version