शार्लोट लेकचे पाणी सोडल्याप्रकरणी वाद; जिल्हाधिकाऱ्यांनी मागवला अहवाल
| नेरळ | प्रतिनिधी |
माथेरान शहराच्या पाणीपुरवठ्याचा प्रमुख स्रोत असलेल्या शार्लोट लेकचे पाणी नगरपरिषदेने 10 ऑगस्टनंतर वारंवार सोडल्याच्या प्रकाराची रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी गंभीर दखल घेतली आहे. भरपावसात तलावातील पाणी का सोडण्यात आले, यासह संपूर्ण घटनाक्रमाचा अहवाल सादर करण्याची नोटीस माथेरान नगरपरिषदेला बजावण्यात आली आहे.
शार्लोट लेकमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचला असून, तो काढण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. 10 ऑगस्ट रोजी गाळ वाहून जावा या उद्देशाने पाणी सोडण्यात आले. मात्र, त्यानंतरही गाळ कायम राहिल्याने काही दिवस पाणी अडविणे आणि पुन्हा सोडणे सुरू असल्याचा आरोप आहे. दरम्यान, तलावातील तब्बल एक हजार ट्रक गाळ काढल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, एवढा गाळ प्रत्यक्षात कुठे गेला, याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात येत असून, या दाव्याचीही चौकशी करण्याची मागणी होत आहे.
शार्लोट लेकच्या पाणी व्यवस्थापनात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची भूमिका महत्त्वाची आहे. असे असताना पाणी सोडण्याचा निर्णय घेताना जीवन प्राधिकरणाला तसेच संबंधित प्रशासकीय यंत्रणांना विश्वासात घेतले होते का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. माथेरान मॉनिटरिंग समितीची परवानगी घेण्यात आली होती का, याचीही चौकशी होणार आहे.
तलावातील पाणी सोडण्याच्या विहिरीची चावी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या ताब्यात असल्याचे सांगण्यात येत असल्याने ती चावी कोणी उपलब्ध करून दिली आणि कोणाच्या आदेशाने पाणी सोडण्यात आले, याकडेही लक्ष लागले आहे. तसेच गाळमिश्रित पाणी मोरबे धरणात गेल्याचा आरोप असल्याने त्याचीही प्रशासनाकडून दखल घेतली जाण्याची शक्यता आहे. जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी नगरपरिषदेकडून संपूर्ण अहवाल मागविल्याने आता पाणी सोडण्याचा निर्णय नेमका कोणाच्या आदेशाने झाला आणि त्याची जबाबदारी कोणाची, हे स्पष्ट होणार आहे. या चौकशीकडे माथेरानकरांचे लक्ष लागले आहे.







