आसूड गावाजवळ पाण्याची गळती

लाखो लिटर पाणी वाया

| पनवेल | प्रतिनिधी |

पनवेल तालुक्यातील आसूड गावाजवळ मुंबई-पुणे एक्सप्रेसवे बाजूने जाणाऱ्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या पाणी पुरवठा पाईपलाईनमधून दररोज लाखो लिटर पाणी रस्त्यावर वाहून जात असल्याचे गंभीर चित्र समोर आले आहे. या गळतीमुळे रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनचालकांना तसेच नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

विशेष म्हणजे, पनवेल महानगरपालिकाच्या महासभेत सत्ताधारी व विरोधकांनी पाणी प्रश्नावर प्रशासनाला धारेवर धरले होते. मात्र, प्रत्यक्षात अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या या गळतीकडे अद्याप कोणतेही ठोस लक्ष दिले गेले नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. फुटपाथच्या बाजूने गेलेल्या या पाईपलाईनमुळे वारंवार नुकसान होऊन पाणी वाया जात असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. उन्हाळ्याच्या तोंडावर सर्वत्र पाण्याची टंचाई भासत असताना अशा प्रकारे लाखो लिटर पाणी वाया जाणे चिंतेची बाब ठरत आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित पाईपलाईन तात्काळ दुरुस्त करून ती अंडरग्राऊंड करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. यामुळे भविष्यात अशा गळतीच्या घटना टाळता येतील, असा विश्वास नागरिक व्यक्त करत आहेत. दरम्यान, इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात असताना याला जबाबदार कोण, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. प्रशासनाने तातडीने कारवाई करून पाणी वाचवावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Exit mobile version