| सुधागड-पाली | प्रतिनिधी |
पाली नगरपंचायत हद्दीतील गांधी चौक मार्गावर गेल्या अनेक दिवसांपासून पाण्याची गळती सुरू असून, शेकडो लिटर पाणी वाया जात आहे. या गळतीमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, सार्वजनिक आरोग्यावरही धोका निर्माण झाला आहे.
याबाबत स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही नगरपंचायतीकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. काही ठिकाणी गटाराजवळच पाण्याच्या वाहिन्या फुटल्यामुळे दुषित पाणी रस्त्यावर साचत आहे, आणि त्यामुळे सांघिक आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शहरात एकीकडे पाणीटंचाईचे संकट गडद होत असताना, दुसरीकडे शेकडो लिटर पाणी रस्त्यावर वाहून जाणे नागरिकांच्या पाण्याच्या हक्कावर अन्याय करणारे असल्याचे मत स्थानिकांनी व्यक्त केले आहे. या परिस्थितीमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून गळती सुरू आहे, परंतु नगरपंचायतीला ती दिसत नाही का? असा थेट सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी तात्काळ गळती दुरुस्त करून पाण्याचा अपव्यय थांबवावा, अशी मागणी केली आहे. तसेच, दैनंदिन देखभाल यंत्रणा सक्षम करण्याची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.







