उरणकरांवर चिंतेचे सावट; पाणी जपून वापरण्याचे आवाहन
| चिरनेर | प्रतिनिधी |
अल निनोच्या भयंकर संकटामुळे पावसाने ओढ दिल्याने सर्वत्रच पाण्याची समस्या गंभीर बनली आहे. उरण परिसरही पाणी टंचाईला अपवाद नाही. तालुक्यातील शहर, ग्रामीण आणि औद्योगिक परिसराला पाणीपुरवठा करणारे एकमेव असलेले रानसई धरणाच्या पाण्याची पातळी पावसाअभावी दररोज एक एक इंचाने घटत चालली आहे. यामुळे उरणकरांना ऑक्टोबर महिन्यापासूनच गरजे इतक्यात पाण्यासाठी आणखी किमान पुढील दहा महिन्यांपर्यंत संघर्ष करावा लागणार आहे. पाणीपुरवठ्याचे आणखी कोणतेही स्त्रोत नसल्याने उरणकरांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन शासकीय स्तरावरून केले जात आहे.
सुमारे दोन लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या उरण तालुक्याला पाणी पुरवठा करणाऱ्या रानसई धरणाची उंची 116 फुट आहे. मात्र पावसाअभावी पाणी साठवण क्षमता शुक्रवारपर्यंत (16) 113.2 फुटापर्यंत कमी झाली आहे. दररोज धरणाची पाणीपातळी एका इंचाचे कमी होत चालली आहे. जलकुंभ, पाणी शुद्धीकरण यंत्रणाही सुस्थितीत आहे. तसेच जलवाहिन्यांतील पाणी गळतीचे प्रमाणही अत्यल्प आहे. मात्र याउपरही दररोज धरणातील घटणारी पाण्याची पातळी सर्वांसाठी चिंताजनक बाब आहे.
याआधीपासून मंगळवार, शुक्रवार असे आठवड्यातून दोन दिवस पाणी लागू करण्यात आली आहे. त्यानंतर आता शासनानेच पाणी कपातीचे आदेश दिले आहेत. मात्र सध्या सणासुदीचे दिवस असल्याने उरणच्या नागरिकांसाठी असलेली पाणी कपात येत्या 27 ऑक्टोबरपासून लागू करण्यात येणार असल्याची माहिती उरण एमआयडीसीचे उप अभियंता तानाजी कांबळे यांनी दिली. पावसाअभावी आलेल्या भीषण पाणीटंचाईच्या संकटाचा सामना करण्यासाठी नागरिकांनी पाणी जपून आणि काटकसरीने वापर करण्याचे आवाहन एमआयडीसीचे उप अभियंता तानाजी कांबळे यांनी केले आहे.
कोणतेही स्त्रोत नसल्याने उरण शहराला एमआयडीसीकडून पाणीपुरवठा केला जात आहे. 35 ते 40 हजारांची लोकसंख्या असलेल्या उरण शहराला दररोज 4.50 एमएलडी इतक्या पाण्याची गरज भासते. मात्र पाण्याचे योग्य प्रकारे नियोजन नसल्याने 40 कोटींची थकबाकी असलेल्या उरण नगरपरिषदेला पाणी टंचाईच्या झळा सहन करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. त्यातच मागील 15 ते 20 वर्षांपासून उनपने असलेल्या 5 जलकुंभाची साफसफाईच केली नाही. यामुळे नागरिकांवर अशुद्ध पाणी पिण्याची वेळ येऊन ठेपली आहे, असा आरोप दस्तुरखुद्द नगराध्यक्षा भावना घाणेकर यांनीच करून ही गंभीर बाब प्रशासनाच्या नजरेत आणून दिली आहे. त्यातच शहरातील सुरू असलेल्या सुमारे 25 इमारतींच्या बांधकामासाठी प्रशासनाकडूनच बिनबोभाटपणे पाणी पुरवठा केला जात असल्याचाही गंभीर आरोप नागरिकच नव्हे, तर उनपच्या सत्ताधारी नगरसेवकांकडूनच केला जात आहे. मात्र या गंभीर प्रकरणाकडे प्रशासनाकडूनच जाणीवपूर्वक कानाडोळा केला जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. यामुळे उरणवासियांना पाणी टंचाईचा याआधीच सामना करावा लागतो आहे. यामध्ये आता शासनाने लागू केलेल्या पाणी कपातीची भर पडली आहे. मात्र पाणीपुरवठ्याचे नियोजन योग्य प्रकारे केले जात आहे. तसेच जलकुंभही सुस्थितीत असून थोड्याफार प्रमाणात दुरुस्तीची गरज आहे. त्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू असल्याचे नगररचनाकार निखिल ढोरे यांनी सांगितले.
पाणी टंचाईचे गहिरे संकट
उरण परिसरात याआधीच ठिकठिकाणी निधीअभावी रखडलेल्या पाणी पुरवठा योजना, पाणी पुरवठ्यातील नियोजनाचा अभाव, पाणी चोरी, याकडे शासकीय यंत्रणेचे होणारे दुर्लक्ष यामुळे उरण परिसरातील पाणी टंचाईने त्रस्त आहेत. चाणजे, केगाव ग्रामपंचायत हद्दीतील गावांना याआधीच 15-15 दिवसात फक्त एक दिवसच अर्धा -तासभर पाणी मिळते. आता तर पावसाअभावी पाणी टंचाईचे संकट आणखी गहिरे बनल्याने येऊ घातलेल्या पाणीबाणीचा कसा सामना करावा, याचीच सर्वाधिक चिंता उरणवासियांना भेडसावत आहे.
