नदीतील जल प्रदूषण माशांच्या जीवावर

| सुकेळी । वार्ताहर ।

रोहा तालुक्यातील नागोठणेजवळच असलेल्या हेदवली व अंबा नदीच्या पाण्यामध्ये मृत मासे पाण्यावरती तरंगत असल्याचे येथील स्थानिक ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. मासे मृत होण्याचे नक्की कारण अद्यापही समजले नाही. यामागे एखादा केमिकल घेऊन जाणारा टँकर धुतल्यामुळे किंवा औद्योगिक सांडपाणी सोडल्यामुळे हे मासे मृत झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.

हेदवली येथील नदीवर हेदवली, ऐनघर, कानसई तसेच काही आदिवासी वाड्यांवरील नागरिक या पाण्याचा वापर आंघोळी, कपडे आणि गुरांना पाणी पिण्यासाठी तसेच विविध कामांसाठी करत असतात. याआधीच हेदवली गावामध्ये अनेक महिन्यांपासून पाण्याची टंचाई असताना या नदीच्या पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात मृत मासे पाण्यावरती तरंगल्यामुळे संपूर्ण पाणी दुषित झाले आहे. हेदवली नदीचे पाणी हे वाकण येथील अंबा नदीला जाऊन मिळत असल्यामुळे हे सर्व मृत मासे पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत अंबा नदीमध्ये आल्यामुळे सर्वत्र मृत माशांचा खच दिसत आहे.

या प्रदुषित झालेल्या पाण्यामुळे वाकण, पाटणसई, बाळसई, गोडसई, वजरोली आदी गावांतील नागरिकांना प्रदुषित झालेल्या पाण्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे. नदीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्या महिलांना तर मृत माशांच्या वासामुळे उलटी, डोकेदुखी असे आजार उद्भवले आहेत. मासेमारीचा व्यवसाय करणार्‍या कोळी बांधवांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. त्यामुळे या विभागातील नागरिकांपुढे सद्यपरिस्थितीत नदीच्या पाण्याचा वापर करावा की नाही, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. दरम्यान यासंबंधीत प्रशासनाने पाण्याचे तसेच मृत माशांचे नमुने तपासणीसाठी घेऊन नक्की यामागे काय कारण आहे हे शोधून याबाबतीत योग्य त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी होत आहे.

Exit mobile version