वीटभट्टी परिसरातील पाणीप्रश्‍न गंभीर

टँकरने पाणी आणण्याची वेळ
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत नगरपरिषद हद्दीमधील बामचा मळा भागातील वीटभट्टी परिसरात गेल्या काही दिवसांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार मल्हारी माने यांनी केली आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची तहान भागविण्यासाठी टँकरने पाणी विकत घ्यावे लागत आहे. कर्जत शहरातील दहीवली इंदिरानगर भगालगत बामचा मळा ही वस्ती असून, त्या ठिकाणी वीटभट्टी हा मोठा परिसर आहे. तेथे अनेक वर्षापासून वीटभट्टी कामगार असून, त्यांनी नगरपरिषद पाणी पुरवठा विभागाकडून रीतसर नळजोडणी घेतली आहे. त्या ठिकाणी 15 कुटुंबांची वस्ती असून, बामचा मळा भागाला पालिकेच्या दहीवली जलकुंभमधून पाणी पुरवठा होत असतो.

मात्र मागील काही दिवसांपासून या भागातील वीटभट्टी कामगारांना आणि तेथील बामचा मळा मधील रहिवाशी यांना कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे त्या ठिकाणचे रहिवाशी असलेल्या वीटभट्टी कामगारांना अन्यत्र जावून बोअरवेल मधून पाणी भरून आणावे लागत आहे. कामगारांची गैरसोय होऊ नये यासाठी ट्रँकरने पाणी पुरवठा करण्याची वेळ तेथील वीटभट्टी मालकांवर आली आहे. कर्जत शहराची पाणी योजना ही 1998 मध्ये प्रत्यक्षात आली असून, नवीन नळपाणी योजना राबविण्याची गरज या निमित्ताने पुढे येत आहे.

Exit mobile version