| माथेरान | प्रतिनिधी |
ऐन सुट्टयांच्या हंगामात पाण्याचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे पर्यटनावर विपरीत परिणाम होऊ नये यासाठी स्वतः नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांनी नेरळ येथील कुंभे, जुमापट्टी आणि वॉटर पाईप याठिकाणी असणाऱ्या पंपिंग हाऊस वर भेट देऊन संबंधित अधिकारी कर्मचारी यांच्याशी चर्चा करून कोणत्याही परिस्थितीत पंधरा तास पाणी पंपिंग करावे असे सूचित केल्यानंतर अखेर माथेरानला पंधरा तास पाणी पंपिंग सुरू झाल्यामुळे पाण्याचा प्रश्न जवळपास संपुष्टात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
यावेळी त्यांच्या सोबत माथेरान उबाठाचे अध्यक्ष कुलदीप जाधव, उपनगराध्यक्ष संतोष शेलार उपस्थित होते. घाटात अनेक ठिकाणी पाणी चोरीच्या घटना घडत आहेत. परंतु, संबंधित अधिकारी वर्गाने दुर्लक्ष केल्यामुळे माथेरानला कमी दाबाने पाणी पुरवठा व्हायचा काही ठिकाणी चंद्रकांत चौधरी यांनी चोरीचे कनेक्शन स्वतः काढून टाकले आहेत.
पावसाळ्यात नेरळ येथून पाणी पुरवठा केला जात नाही. परंतु, उन्हाळ्यात ऐन सुट्ट्यांच्या हंगामात पाण्याची कमतरता भासली होती त्यामुळे येथील शारलोट लेक मधून पाण्याचा उपसा करण्यात आला होता या लेकची पाण्याची पातळी सुध्दा खाली गेली आहे. त्यामुळे नेरळ उल्हास नदीतून हा वाढीव पाणीपुरवठा केला जात आहे.







