आमदारांच्या गावात पाण्याचा खडखडाट; रस्त्यांचीही दूरवस्था

डोक्यावरील हंडा उतरणार कधी, महिलांचा थेट आमदारांना सवाल
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

निवडणूकिपूर्वी अनेक आश्‍वासने देऊन सत्तेत आलेले अलिबागचे स्थानिक आमदार त्यांच्याच गावातील पाणीप्रश्‍न सोडवू शकले नाहीत. गेले कित्येक दिवस थळ ग्रुप ग्रामपंचायतीमधील ग्रामस्थांना पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागत आहे. आमदारांच्याच गावात पाण्यासाठी वणवण करावी लागणे, ही शोकांतिका असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरु आहे. परिणामी, पाण्यासाठी थळमधील ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. त्याचप्रमाणे रस्ते व इतर मूलभूत सुविधांची देखील वानवा असल्याने ग्रामस्थांमध्ये वाढती नाराजी आहे. त्यामुळे सर्वपक्षीय जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याच्या तयारीत आहेत.
गेल्यावर्षी देखील थळ चाळमळा येथील महिलांनी थळ ग्रामपंचायतीच्या कार्यालयात चार तास ठिय्या आंदोलन केले होते. सत्तेत असतानाही पाणीप्रश्‍न सोडविण्यास आमदार असमर्थ ठरल्याने महिलांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. अनेकदा तक्रार करुनही पाणीप्रश्‍न सुटत नसल्यामुळे गावातील महिला थेट जिल्हाधिकार्‍यांकडे दाद मागणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आरसीएफसारखा कारखाना असलेली थळ ग्रुप ग्रामपंचायत तालुक्यातील सर्वात श्रीमंत ग्रामपंचायत समजली जाते. स्थानिक आमदार यांची सत्ता असतानाही इतक्या वर्षात या ग्रामपंचायतीचे मूलभूत प्रश्‍नदेखील त्यांना सोडविण्यात यश आले नाही. थळ बाजार कोळीवाडा येथील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी गतवर्षी ठिय्या आंदोलन करावे लागले होते.

पाणीप्रश्‍न सोडविण्यास ग्रामपंचायत असमर्थ
थळ बाजार कोळीवाड्यात रात्री 2-2 वाजेपर्यंत जागूनदेखील पाणी मिळत नसल्याने पिण्याचे पाणी विकत आणायची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. ग्रामपंचायत पिण्याचा पाण्याचा प्रश्‍न सोडविण्यास असमर्थ ठरत असल्याने येत्या काही दिवसात सर्वपक्षीयांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

रस्त्यांचीही बिकट अवस्था
रस्त्यांची झालेली बिकट अवस्था, पिण्याच्या पाण्यासाठी होत असलेली पायपीट आदींमुळे शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांच्याविरोधात नागरिकांमध्ये आक्रोश वाढत आहे. पाण्याप्रमाणेच थळ मतदारसंघातील बहुसंख्य रस्ते खराब आहेत. त्यामध्ये थळपेठ-चाळमाळा, पाळथी-नवगाव, चाळमाळा, लोणारे आदींचा त्यामध्ये समावेश आहे. या रस्त्यांवरूनच नागरिकांना प्रवास करावा लागत आहे.

Exit mobile version