भवानीपाडा येथे पाणीटंचाई; प्रशासनाचे दुर्लक्ष

खासगी जागेत बोरवेल मारल्याने पाणी देण्यास नकार
। नेरळ । वार्ताहर

बोरगाव-भवानीपाडा येथे गेल्या अनेक वर्षांपासून पाणी टंचाईची समस्या जाणवत आहे. ग्रामपंचायतीसह, पंचायत समिती, कर्जत तहसिदार यांना दोन वर्षांपूर्वी पत्रव्यावर करूनही आजपर्यंत कोणीही तक्रारीची दखल घेतली नाही. तसेच येथील पाणी टंचाईची समस्या जाणून घेतली नसल्याने ही पाणीटंचाई आजही सुटली नाही. त्यामुळे येथील ग्रामस्थांना अनेक वर्षांपासून पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.


कर्जत तालुक्यातील ओलमण ग्रामपंचायत हद्दीतील बोरगाव-भवानीपाडा येथे तीन वर्षांनपूर्वी ओलमण ग्रामपंचायतीने एका खाजगी जागेत बोरवेल मारली आहे. परंतू त्या जागा मालकाने इतर ग्रामस्थांना पाणी भरण्यास नकार दिला आहे. या सदंर्भात येथील नागरिकांनी ग्रामपंचयतीच्या वारंवार निदर्शनास आणुन देखील ग्रामपंचायतीने याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे येथील नागरिकांना आजही पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून दुरवरून बैलगाडी तसेच चारचाकी वाहनांतून पाण्ीा आणावे लागत आहे. येथील ग्रामस्थ राकेश खडेकर यांनी 26 मे 2020 रोजी पंचायत समिती कर्जत, कर्जत तहसिल कार्यालय, नेरळ पोलिस ठाणे येथे बोरवेलच पाणी भरून देत नसल्याबाबत तक्रार केली आहे. परंतू दोन वर्षांत या तक्रारीची आजपर्यत कर्जत तहसिल कार्यालय व पंचायत समितीच्या अधिकार्यांनी साधी दखलही घेतली नसल्याने पाणी टंचाईची समस्या आजही कायम आहे. येथील महिलांना डोक्यावर ड्रम भरून तसेच नागरिकांना बैलगाडीने पाणी आणावे लागत आहे, असे असताना अधिकारीवर्ग मात्र पाणी टंचाईवर उपाययोजना करू शकली नसल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे लवकरात लवकर या संमस्येवर उपाययोजना करावी अशी मागणी भवानीपाडा येथील टंचाई ग्रस्त ग्रामस्थांकडून केली जात आहे.

भवानीपाडा येथे ग्रामपंचायतीने खासगी जागेत बोरवेल मारली आहे. त्या बोरवेल मधून आम्हाला पाणी भरून दिले जात नाही. यासंदर्भात आम्ही ओलमण ग्रामपंचायतीसह पंचायत समिती कर्जत, कर्जत तहसिल कार्यालयात 2020 ला तक्रार केली आहे. परंतू आमच्या तक्रारीची दखल आजपर्यंत कोणीही घेतली नाही. त्यामुळे अनेक वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे आमची समस्या तात्काळ दूर करावी.

राकेश खडेकर, ग्रामस्थ, भवानीपाडा
Exit mobile version