213 ठिकाणी 43 टँकरद्वारे पाणीपुरवठा
। अलिबाग । प्रमोद जाधव ।
रायगड जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 44.7 टक्के पाऊस पडला आहे. या पावसात विहीरीसह काही सखल भागांमध्ये पाणी साचू लागले आहे. मात्र ऐन पावसाळ्यातही 150 वाड्या व 63 गावांमधील 84 हजार 184 नागरिकांना पाण्याचा दुष्काळ आहे. या दुष्काळग्रस्त गावे, वाड्यांमध्ये 44 टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. उन्हाळ्यात धरणांसह विहीरी, तलावामधील पाण्याची तळ गाठला. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक भागात पाण्याचा दुष्काळ निर्माण झाला. धरणांतून मुबलक पाणी पुरवठा होत नसल्याने नागरिकांचे पाण्याविना प्रचंड हाल होऊ लागले. पाऊस कधी पडतो याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले होते. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाने संथगतीने सुरुवात केली. जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 195.4 मि.मी पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली आहे. गेल्या वर्षी 41.1 मि.मी. पाऊस पडला होता. गतवर्षीच्या तुलनेने या वर्षी 154.3 मि.मी. अधिक पाऊस पडला. गेल्या वर्षीपेक्षा अधिक पाऊस पडूनही ऐन पावसाळ्यात पाणी संकट कायमच असल्याचे दिसून आले आहे. रायगड जिल्ह्यात अलिबागसह अनेक तालुक्यात पाण्याचा दुष्काळ सुरूच आहे. अलिबागसह आठ तालुक्यांतील 63 गावे, आणि 150 वाड्यांमध्ये पाण्याची समस्या आहे. पाण्यासाठी नागरिकांना वणवण करावी लागत आहे. त्यामुळे प्रशासनाकडून या 213 ठिकाणी 44 टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे.
जिल्ह्यामध्ये जलजीवन व अन्य पाणी पुरवठ्याच्या योजना राबवण्यात आल्या. यातील काही योजना अपुर्णच आहेत. काही योजनांचे काम होऊनही गावांमध्ये पाणी नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी, करोडो रुपये खर्च करूनही पाणी मिळत नसल्याची खंत नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
टँकरचा पुरवठा करणारे तालुके
तालुके | गावे | वाड्या | लोकसंख्या | टँकर |
अलिबाग | 11 | 00 | 16,831 | 03 |
उरण | 00 | 04 | 600 | 01 |
पनवेल | 20 | 28 | 30,122 | 14 |
कर्जत | 16 | 27 | 15,554 | 05 |
खालापूर | 07 | 12 | 10,590 | 06 |
पेण | 04 | 73 | 8,107 | 11 |
माणगांव | 03 | 04 | 1,410 | 03 |
म्हसळा | 02 | 02 | 970 | 01 |
एकूण | 63 | 150 | 84,184 | 44 |