कर्जतमध्ये पाणी टंचाई; टँकरने पाणीपुरवठा

| नेरळ । वार्ताहर ।

डोंगरदर्‍या अशा स्थितीची भौगोलिक परिस्थिती असलेल्या कर्जत तालुक्यात पाणीटंचाई जाणवू लागली आहे. तालुक्यातील 18 गावे आणि 60 वाड्यामध्ये कमी अधिक प्रमाणात पाणीटंचाई भासू लागली आहे. त्यामुळे ग्रामपंचायतचे मागणीनुसार कर्जत पंचायत समितीकडून शासकीय ट्रँकरने पाणीटंचाई भागात पाणीपुरवठा करण्यास सुरुवात झाली आहे. तालुक्यातील चार आदिवासी वाड्या आणि एका गावातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी टँकर सुरू झाले आहेत.

तालुक्यात डोंगरावर असलेल्या आदिवासी वाड्यांमध्ये दरवर्षी पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत असते. तालुक्यातील चार प्रमुख नद्यांपैकी उल्हास नदी आपल्या अर्ध्या प्रवासात तर नंतर पुढे बारमाही वाहत असते. पेज नदी वगळता पोश्री आणि चील्हार या दोन नद्या उन्हाळयात कोरड्या असतात. त्यामुळे पोश्री आणि चिल्हार नदीच्या लगतच्या गावांमध्ये पाण्याची समस्या उन्हाळ्यात अधिक तीव्र असते.

यावर्षी कर्जत तालुक्यातील खांडस, ओलमन, चेवणे, नांदगाव, तुंगी, ढाक, पेठ, अंत्रट निड, अंत्रटवरेडी, मोग्रज, पिंगळस, धामणी, खानंद, अंभेरपाडा, मोहोपाडा, भोपळेवाडी, सुतार पाडा, गरुडपाडा ही गावे पाणीटंचाईग्रस्त गावे आहेत. तालुक्यातील पाच डझन आदिवासी वाड्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. तालुक्यातील काटेवाडी, आनंदवाडी, भक्तांचीवाडी, पादिरवाडी, चौधरवाडी, जांभूळवाडी, बांगरवाडी, पेटारवाडी, चाफेवाडी, वडाचीवाडी, टेपाचीवाडी, मोरेवाडी, ताडवाडी, वनाचीवाडी, बेलाचीवाडी, भागुचीवाडी एक, भागूचीवाडी दोन, मेंगालवाडी, चिमटेवाडी, विठ्ठलवाडी, किरवली ठाकूरवाडी, सावरगाव ठाकूर वाडी, हर्याचीवाडी, विकासवाडी, तेलंगवाडी, आशाणे ठाकूरवाडी, नागेवाडी, जांभूळवाडी, बोरीचीवाडी, चिंचवाडी, मिरचुलवाडी, काल्याचीवाडी, आसलवाडी, नाण्याचमाळ, आसल धनगरवाडा, सगाचीवाडी,धामणदांड, ठोंबरवाडी, ढाक कळकराई, माणगाव ठाकूरवाडी, बेकरेवाडी, स्टेशन ठाकूरवाडी, नवसुची वाडी, वारे जांभूळवाडी, पाषाने खाड्याचापाडा मधली वाडी, चाहुची वाडी, मिरचोलवाडी, नारलेवाडी, मेंगलवाडी, भोमलवाडी, नांदगाव कातकरी वाडी, दामत कातकरीवाडी, पाच खडकवाडी, रजपे कातकरी वाडी आदी 60आदिवासी वाड्या पाणी टंचाईग्रस्त आहेत.

शासनाने कर्जत तालुक्यातील पाणीटंचाई ग्रस्त भागातील चार आदिवासी वाड्या आणि एका गावाला टँकरने पाणी पुरवठा सुरू केला आहे.17 एप्रिल पासून कर्जत तालुक्यात शासनाच्या एका टँकरच्या माध्यमातुन पाणी पुरवठा करण्यास सुरुवात झाली आहे. सांगली येथून शासकीय टँकर कर्जत तालुक्यातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी मागविण्यात आले आहेत. 12 हजार लिटर पाण्याची क्षमता असलेले ते टँकर असून सध्या एका टँकरचे माध्यमातून पाणीटंचाई ग्रस्त भागातील आदिवासी वाड्यांना पाणीपुरवठा सुरू झाला आहे. पेज नदीवरून पाणी भरण्याचे काम करून हा टँकर पाणीटंचाई असलेल्या भागाला पाणी पोहचवत आहे. पाथरज ग्रामपंचायत मधील ताडवाडी, मोरेवाडी तर खांड्स ग्रामपंचायत मधील पेटारवाडी, मोग्रज ग्रामपंचायत मधील पिंगळस या ठिकाणी कालपासून तर बोरिवली ग्रामपंचायत मधील गुडवण वाडी मध्ये आजपासून टँकरने पाणीपुरवठा सुरू झाला आहे, अशी माहिती कर्जत पंचायत समिती मधील पाणी पुरवठा आराखडा कृती समितीकडून काम पाहणारे गोवर्धन नखाते यांनी दिली आहे.

आम्ही ग्रामपंचायत कडून मागणी आल्यानंतर त्या त्या टंचाईग्रस्त भागाची तात्काळ पाहणी करतो आणि लगेच टँकर सुरू करण्याची कार्यवाही सुरू करतो. त्यानुसार आता एका शासकीय टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा सुरू झाला आहे. आवश्यकतेनुसार आणखी शासकीय टँकर मागविले जातील आणि पाणीटंचाई दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल.

चंद्रकांत साबळे, गटविकास अधिकारी आणि प्रशासक, कर्जत पंचायत समिती
Exit mobile version