रांजणखार, मिळकतखारमध्ये पाणी टंचाई

। अलिबाग । प्रतिनिधी ।

जिल्ह्यातील कर्जत, खालापूर, महाड, पेण, पोलादपूर, सुधागड तालुक्यात पाणी टंचाईची समस्या भेडसावत असताना आता अलिबाग तालुक्यातदेखील पाण्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. तालुक्यातील रांजणखार व मिळकतखार या दोन गावांत पाण्याचा दुष्काळ सुरु झाला असून याठिकाणी एक टँकरची सुविधा उपलब्ध केली आहे.

जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत शासनाच्या वेगवेगळ्या योजना राबविल्या जात आहेत. परंतू पाण्याचा प्रश्‍न जिल्ह्यातील गावांना कायमच निर्माण झाला आहे. धरणांमधील पाण्याची पातळी कमी झाल्याने अलिबाग तालुक्यातील रांजणखार व मिळकतखार गावांमध्ये पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. या दोन गावांमध्ये टँकरने पाणी पुरवठा सुरु केला आहे. गावांतील दोन हजार 274 नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. जिल्हा टँकरमुक्त करण्याच्या घोषणा जिल्ह्याच्या होत असताना या घोषणा फक्त कागदावर असल्याचे चित्र यातून समोर येत आहे. अलिबाग तालुक्यातील मिळकतखार, रांजणखार मध्ये पाण्याची समस्या कायमच निर्माण होत असताना, त्यावर ठोस उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. या गावाला एमआयडीसीमार्फत पाणी पुरवठा होतो. परंतू आठ ते पंधरा दिवस पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. जलजीवन मिशन योजनेअंतर्गत एक कोटी पेक्षा अधिक रुपयांचा निधी मंजूर केला आहे. मात्र अद्यापही या गावांतील नागरिकांपर्यंत या योजनेमार्फत पाणी पोहचले नसल्याची माहिती अभिजीत कडवे यांनी दिली.

Exit mobile version