कर्जत तालुक्यात पाणीटंचाई तीव्र

चार गावे, चार आदिवासी वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यात उन्हाळ्याची तीव्रता वाढताच पाणीटंचाईने डोके वर काढले आहे. तालुक्यातील काही नद्या बारमाही वाहात असल्या तरी अनेक प्रमुख नद्या व उपनद्या उन्हाळ्यात कोरड्या पडत असल्याने विशेषतः दुर्गम व आदिवासी भागात पाण्याचे मोठे संकट निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने पाणीटंचाई आराखड्याची अंमलबजावणी सुरू करत चार गावे आणि चार आदिवासी वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे. तसेच आणखी चार गावांकडून टँकरची मागणी करण्यात आली आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही मार्चपासून तालुक्यात पाणीटंचाई जाणवू लागली आहे. टाटा धरणाच्या पाण्यावर पेज नदी काही अंतरापर्यंत वाहते; मात्र त्याआधी उल्हास नदी कोरडी पडते. तसेच, चिल्हार व पोश्री या नद्या आणि अनेक उपनद्या उन्हाळ्यात आटत असल्याने परिस्थिती गंभीर बनते. दरम्यान, जलजीवन मिशन अंतर्गत अनेक नळपाणी योजना निधीअभावी रखडल्याने समस्या अधिकच वाढली आहे. याची दखल घेत डिसेंबर 2025 मध्ये पाणीटंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला होता. त्यानुसार यंदा तालुक्यातील 20 गावे आणि 39 आदिवासी वाड्या पाणीटंचाईग्रस्त म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत.

तालुक्यातील उमरोली ग्रामपंचायतीतील अशाणे येथे यंदाचा पहिला शासकीय टँकर सुरू करण्यात आला आहे. त्यानंतर कोशाणे, उमरोली आणि ओलमन ग्रामपंचायतीतील झुगरेवाडी या गावांनाही टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू झाला आहे. तसेच किरवली ठाकूरवाडी, सावरवाडी ठाकूरवाडी, पळसदरी ठाकूरवाडी आणि वर्णे ठाकूरवाडी येथेही टँकर सुरू करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी स्तरावर मागवलेल्या निविदेनुसार कर्जत तालुक्यासाठी 14 हजार लीटर क्षमतेचे पाच टँकर मंजूर करण्यात आले असून, त्याद्वारे पाणीटंचाईग्रस्त भागांना पाणीपुरवठा केला जात आहे. वाढत्या उष्णतेमुळे पिण्याच्या पाण्याची मागणी वाढत असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे.

तालुक्यातील आणखी चार ठिकाणी टँकर सुरू करण्याची मागणी प्राप्त झाली आहे. त्या ठिकाणी पाहणी करून आवश्यक त्या ठिकाणी टँकर सुरू करण्याची कार्यवाही लवकरच केली जाईल.

केशव जाधव,
स्थापत्य अभियांत्रिकी सहायक
Exit mobile version