दिवाळीतही खारघरवासियांचे नळ कोरडे

24 तास पाण्याच्या आश्वासनाचा फज्जा; सिडकोच्या पाणी नियोजनाचे धिंडवडे

। पनवेल । प्रतिनिधी ।

एकीकडे दिवाळीचा जल्लोष सुरू असताना दुसरीकडे खारघरमधील नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे. 24 तास पाणीपुरवठ्याच्या गोड आश्वासनावर घरे खरेदी करणाऱ्या रहिवाशांच्या नळाला मात्र काही मिनिटेच पाणी येत असल्याने सिडकोच्या पाणीपुरवठा नियोजनाचा बोजवारा उडाला आहे. सणासुदीच्या दिवसांतही टँकर मागवून आणि पिण्याचे पाणी विकत घेऊन दिवस काढावे लागत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

खारघरमधील बागेश्री सोसायटीसह अनेक गृहसंकुलांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून पाणीटंचाईची समस्या कायम आहे. गणेशोत्सव, दसरा आणि आता दिवाळीही पाण्याच्या प्रतीक्षेत गेल्याने सिडकोच्या कारभाराविरोधात रहिवाशांचा रोष वाढला आहे. दिवाळीच्या साफसफाईपासून फराळाची तयारी आणि दैनंदिन वापरासाठीही पाणी उपलब्ध होत नसल्याने विशेषतः महिलांचे हाल होत आहेत.

बागेश्री सोसायटीतील रहिवासी निर्मला परमार यांनी सिडकोच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आठवड्यातील सोमवार तसेच शुक्रवार ते रविवार पाणीपुरवठा होत नसल्याचा, तर मंगळवार आणि बुधवारीही अवघ्या काही मिनिटांसाठी पाणी मिळत असल्याचा त्यांचा आरोप आहे. 24 तास पाणी मिळेल, या विश्वासावर घरे घेतली; मग प्रत्यक्षात पाण्यासाठी टँकरवर अवलंबून का राहावे लागते, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आंदोलन केल्यानंतर काही दिवस पाणीपुरवठा सुरळीत होतो आणि पुन्हा परिस्थिती जैसे थे होते, असा अनुभवही त्यांनी मांडला. सिडकोने पाणीपुरवठा करता येत नसेल तर नागरिकांचे पैसे परत करून घरे परत घ्यावीत, अशी संतप्त मागणी त्यांनी केली.

बागेश्री सोसायटीत तब्बल 23 इमारती असून दहा हजारांहून अधिक नागरिक वास्तव्यास आहेत. या सोसायटीला दररोज सुमारे 14.50 लाख लिटर पाण्याची आवश्यकता असताना मागणीच्या निम्म्याहूनही कमी पाणी मिळत असल्याचा दावा रहिवासी गजेंद्र रसाळ यांनी केला आहे. पिण्यासाठी बाटलीबंद पाणी विकत घेण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. सिडकोच्या अखत्यारीतील इमारतींमध्ये पाणीटंचाई असताना खासगी इमारतींना नियमित पाणीपुरवठा कसा होतो, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्याचबरोबर टँकर लॉबीच्या भूमिकेबाबतही त्यांनी संशय व्यक्त केला आहे.

नियमित, पुरेसा पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी
खारघरचा झपाट्याने वाढणारा विस्तार, वाढती लोकसंख्या आणि पाण्याची वाढती मागणी लक्षात घेऊन सिडकोने सक्षम पाणीपुरवठा व्यवस्था उभारणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात नागरिकांना टँकरच्या दारात उभे राहावे लागत आहे. दिवाळीसारख्या मोठ्या सणातही पाण्यासाठी संघर्ष करावा लागत असेल, तर नियोजनाचा नेमका उपयोग काय, असा संतप्त सवाल खारघरकरांकडून उपस्थित केला जात आहे. सिडकोने या समस्येची तातडीने दखल घेऊन नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा सुरू करावा, अशी जोरदार मागणी होत आहे.
Exit mobile version