85 गावांच्या पाणी योजना मार्गी

| चिपळूण । वृत्तसंस्था ।
चिपळूण-संगमेश्‍वर विधानसभा मतदारसंघातील जलजीवन मिशनअंतर्गत सुरू असलेली कामे अतिशय संथ गतीने चालू आहेत. योजनेत येणार्‍या अडचणी दूर करून त्या मार्गी लावण्याची मागणी आ. शेखर निकम यांनी केली होती. त्यानुसार राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी रखडलेल्या नळपाणी योजनेची अंदाजपत्रके तातडीने करण्याच्या सूचना दिल्या. संगमेश्‍वर तालुक्यातील तांत्रिकदृष्ट्या आराखड्यात समावेश नसलेल्या 64 गावांचा व चिपळूण तालुक्यातील 21 गावांचा येणार्‍या आर्थिक वर्षामध्ये समाविष्ट करून तातडीने अंदाजपत्रक तयार करण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या आहेत.

गेल्या वर्षभरापासून जलजीवन मिशनअंतर्गत विविध गावात नळपाणी पुरवठा योजना राबवण्यात येत आहेत. मात्र या योजनेची कामे संथ गतीने सुरू असल्याने ग्रामपंचायत, लोकप्रतिनिधींकडून यातील समस्या सोडवण्याबाबत मागणी आ. निकम यांच्याकडे केली होती. त्यानुसार रखडलेल्या पाणी योजनांबाबत तोडगा निघण्यासाठी आ. निकम यांनी राज्यमंत्री बनसोडे यांची भेट घेत संयुक्त बैठक घेण्याची मागणी केली होती. त्यानुसार मंगळवारी मंत्रालयात ही बैठक घेण्यात आली. या वेळी योजनेच्या अंमलबजावणीत येणार्‍या अडचणी आमदार निकम यांनी मांडल्या. त्यावर राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी संबंधित अधिकार्‍यांनी विविध सूचना केल्या. या बैठकीला आ. शेखर निकम, प्रधान सचिव जस्वाल, अभिषेक कृष्णा, अधीक्षक अभियंता सी. आर. कार्यकारी अभियंता दयानंद परवडी, महेश पाटील आदी अधिकारी उपस्थित होते.

Exit mobile version