चिखल, राडा-रोड्याने अपघाती घटनेतवाढ
| पाली | वार्ताहर |
मुंबई-गोवा महामार्गावरील अपूर्ण काम, खड्डे आणि धूळ यामुळे प्रवासी पुरते हैराण झाले आहेत. अनेक ठिकाणी काँक्रीटीकरणाचे काम सुरू आहे. वाकण नाक्यावर देखील अशा प्रकारे काम सुरू असून तेथे प्रचंड प्रमाणात धुरळा व सिमेंटचा बारीक भुगा उडत आहे. यावर उपाय म्हणून या मार्गावर टँकरद्वारे पाणी टाकले जात आहे. मात्र, हा उपाय कुचकामी ठरत आहे.
येथून अवजड व प्रवासी वाहतूक होत असून अवजड व हलकी वाहने गेल्यावर ही धूळ बाहेर उडत आहे. याचा त्रास येथे वाहनांची वाट पाहत असलेले प्रवासी, वाहन चालक, दुचाकीस्वारांना होत आहे. तसेच महामार्गाशेजारील दुकानदार, हॉटेल व्यावसायिक व रहिवाशी देखील त्रस्त झाले आहेत. पाणी मारल्यावर तात्पुरत्या स्वरूपात धुळीपासून दिलासा मिळतो. मात्र पाणी सुकल्यावर पुन्हा धुळीचा त्रास डोके वर काढतो. शिवाय पाणी मारल्याने पाण्याचा अपव्यय देखील होतो. तसेच चिखल झाल्यावर दुचाकी घसरण्याचा धोका देखील संभवतो.
खड्यांबरोबरच धुळीने प्रवासी व चालकांना ग्रासले आहे. पळस्पे ते इंदापुर या 84 किमी मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम मागील 10 ते 12 वर्षांपासून संथ गतीने सुरू आहे. हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे आहे. पावसाळ्यात या महामार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे धूळ वाहन चालक, दुचाकीस्वार व प्रवाश्यांच्या नाकातोंडात जावून त्याचा त्यांना खुप त्रास होत आहे. श्वसनाचे विकार असलेल्यासह, लहान मुले व वृद्ध यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. हि धुळ इतक्या मोठ्या प्रमाणत उडते कि बर्याचदा समोरून येणारे वाहन देखील दिसत नाही. त्यामुळे अपघात होण्याचा धोका आहे. हा धुरळा वाहन चालक आणि प्रवाश्यांच्या अंगावर सर्वत्र बसतो. जणू धुरळ्याची आंघोळच होत आहे. त्यामुळे यामार्गाचे काम जलद गतीने करण्याची चालक व प्रवाशांकडून होत आहे.
दुचाकीस्वार बेजार महामार्गावरुन जातांना दुचाकीस्वारांचा धुळीशी थेट संबंध येतो. हेल्मेट घेतलेली असतांना सुद्धा नाकतोंडात धूळ जाते. तसेच संपूर्ण अंगावर देखील धूळ उडते. वारंवार याचा त्रास होऊन दुचाकीस्वार बेजार झाले आहेत.
दुकाने, हॉटेल व घरांना त्रास महामार्गाशेजारी जी दुकाने हॉटेल आणि घरे आहेत त्यांना देखील या धुळीचा खुप त्रास सहन करावा लागतो. वारंवार उडणारी धूळ खाद्य पदार्थ आणि वस्तुंवर देखील बसते त्यामुळे सतत साफसफाई करावी लागते. हॉटेल मधील खाद्य पदार्थ दूकानातील व घरातील वस्तु आणि उपकरणे धुळीमुळे खराब होतात.
नियमित या महामार्गावरुन प्रवास करतो. रस्त्यावरील माती उडून ती नाकातोंडात जाते त्याचा खुप त्रास होतो. महामार्गाच्या चौपदरिकरणाचे काम लवकर सुरु करण्यात यावे. पाण्याचा अपव्यय देखील टाळावा.
अॅड. राकेश पाटील, प्रवासी







