काळ नदीचे पात्र कोरडे; जलसाठ्यांवर वाढता ताण
। माणगाव । प्रतिनिधी ।
सणासुदीच्या आनंदात रमलेल्या माणगावकरांसमोर आता पाणीटंचाईचे गंभीर संकट उभे राहण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. अपुरा पाऊस, सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यांत पावसाने फिरवलेली पाठ आणि नोव्हेंबरमध्येही कायम असलेला उन्हाचा कडाका यामुळे शहराच्या जलस्रोतांवर ताण वाढू लागला आहे. याचे गांभीर्य ओळखून माणगाव नगरपंचायतीने दिवाळीनंतर शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती पाणीपुरवठा विभागातील संबंधित अधिकाऱ्यांनी दिली आहे.
नगरपंचायतीच्या पाणीपुरवठा विभागातील संबंधित अधिकारी बुवा यांच्याकडे याबाबत विचारणा केली असता, एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हा निर्णय अधिकृत असल्याबाबत विचारणा केली असता त्यांनी त्यास दुजोरा दिला. मात्र, दिवाळीचा सण असल्याने ऐन सणासुदीच्या काळात नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी या निर्णयाची अंमलबजावणी दिवाळीनंतर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत नगरपंचायतीकडून स्वतंत्र अधिकृत घोषणाही केली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
माणगाव शहराची जीवनवाहिनी असलेल्या काळ नदीच्या पाणीपातळीत मोठी घट होत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. नदीपात्रातील पाणी आटू लागल्याने अनेक ठिकाणी दगड उघडे पडले आहेत. पावसाळा संपल्यानंतर अपेक्षित जलसाठा निर्माण न झाल्याने आगामी उन्हाळ्यात पाणीपुरवठा कसा सुरळीत ठेवायचा, हा नगरपंचायतीसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यांत अपेक्षित पाऊस झाला नाही. त्यातच नोव्हेंबरमध्येही उन्हाचा तडाखा कायम असल्याने जलस्रोतांमधील पाण्याचे प्रमाण झपाट्याने कमी होण्याची शक्यता आहे. जिल्हा प्रशासनानेही कमी पर्जन्यमान आणि संभाव्य दुष्काळी परिस्थितीची दखल घेतली आहे. या पार्श्वभूमीवर माणगाव शहरातील पिण्याच्या पाण्याचे नियोजन आतापासूनच करण्याची वेळ आली आहे.
पाणी बचतीसाठी जनजागृती
पाण्याचा अपव्यय टाळण्याचे आवाहन करणारा नगरपंचायतीच्या नावाने प्रसारित होत असलेला ध्वनिसंदेश नागरिकांपर्यंत पोहोचत आहे. वाहन धुणे, रस्ते धुणे तसेच झाडांना अनावश्यक पाणी घालणे टाळावे, असे आवाहन त्यातून करण्यात आले आहे. या संदेशाबाबत विचारणा केली असता, हा ध्वनिसंदेश नगरपंचायतीच्या वतीनेच प्रसारित केला जात असल्याचे बुवा यांनी स्पष्ट केले. केवळ ध्वनिसंदेशावर अवलंबून न राहता रिक्षाद्वारे दवंडी देऊनही जनजागृती सुरू करण्यात आली आहे. माणगाव शहरात एकूण १७ प्रभाग असून सुरुवातीला काही निवडक प्रभागांमध्ये या माध्यमातून नागरिकांना पाणी बचतीचे महत्त्व पटवून दिले जात आहे.
