। महाड । प्रतिनिधी ।
महाड नगरपरिषद हद्दीमध्ये नवीन जलवाहिनीच्या कामाला सुरुवात झालेली आहे. या जलवाहिनीच्या कामामुळे महाडमध्ये सध्या काही भागांमध्ये पिण्याच्या पाण्याची बोंब झाली आहे. यामुळे एक दिवस आड करून पाणीपुरवठा होत असल्याने टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे.
केंद्र शासनाच्या माध्यमातून महाड मधील पाणीपुरवठा करणार्या अमृत 2. 0 या योजनेला मंजुरी मिळाल्यानंतर शहरातील संपूर्ण जल वितरण व्यवस्था अद्ययावत होत आहे. या कामासाठी पाण्याच्या मोठ्या टाक्या, हाय डेफिनेशन पॉली पाईप ची वितरण व्यवस्था, तसेच प्रत्येक घरामध्ये नळ पाणीपुरवठा केला जाणार आहे. हे काम दीड वर्षात पूर्ण करावयाचे असून हे काम श्रमगाथा असोसिएट या कंपनीच्या माध्यमातून केले जात आहे. या कामाला जवळपास 64. 81 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाल्यानंतर संबंधित ठेकेदाराने मूळ पाईपलाईन बाधित करण्यास सुरुवात केल्याने शहरातील अनेक भागांमध्ये पिण्याच्या पाण्याची बोंब सुरू झाली आहे. काही विभागामध्ये पिण्याचे पाणी न आल्याने सोसायट्यांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे.