| म्हसळा | प्रतिनिधी |
तोंडसुरे प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना आणि नैसर्गिक जलस्त्रोत योजनेसाठी नव्याने सुमारे 50लक्ष रुपये खर्च करण्यात आले असतानाही मोठी लोकवस्ती असलेल्या सकलप-खारगाव खुर्द गावावर पाणीटंचाईचे संकट ओढवले आहे. विशेष म्हणजे, दोन्ही पाणीपुरवठा योजना कार्यान्वित असतानाही गावात तब्बल 25 वर्षांनंतर प्रथमच टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ शासनावर आली असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. गावात टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आल्याने पाणीपुरवठा योजनांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. योजना सुरू असूनही गाव तहानलेले का? याचा सखोल शोध घेण्याची गरज असल्याचे मत जाणकार नागरिक व्यक्त करत आहेत.
म्हसळा शहरालगत असलेल्या सकलप-खारगाव खुर्द हद्दीतील परिसरात गेल्या काही वर्षांत लोकवस्ती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे दरवर्षी उन्हाळ्याच्या अखेरीस येथे पाणीटंचाई निर्माण होत असल्याचेही महादेव पाटील यांनी सांगितले. यंदा नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये पाण्याची उपलब्धता कमी झाल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. त्यातच तोंडसुरे प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने होत नसल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत असून, त्याचा थेट फटका खारगाव खुर्द येथील नागरिकांना बसत आहे. गावात कोट्यवधींच्या योजना राबवूनही नागरिकांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत असल्याने संबंधित विभागाच्या नियोजनावर प्रश्न उपस्थित होत आहेत. पाणीपुरवठा व्यवस्थेतील त्रुटी दूर करून कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
सकलप-खारगाव खुर्द गावात टँकरने पाणीपुरवठा
