पाली नगरपंचायतीचे कारभारावर प्रश्नचिन्ह
| सुधागड-पाली | वार्ताहर |
पाली येथील हटाळेश्वर चौकात पाण्याची गळती पुन्हा सुरू झाल्यामुळे शेकडो लीटर पाण्याची नासाडी होत आहे. या समस्येमुळे स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली असून, नगरपंचायतीच्या कामावर प्रश्नचिन्ह उभे केले आहे.
नगरपंचायतीच्या कामाचे वर्णन नागरिकांनी चार दिन की चांदनी, फिर अंधेरी रात या म्हणीने केले आहे. काही दिवसांच्या सुधारणानंतर पुन्हा समस्या उद्भवणे, यामुळे नागरिकांमध्ये संताप पसरला आहे. हटाळेश्वर चौकातील पाण्याची गळती महिनोमहिने चालू आहे; परंतु अद्याप या समस्येचा कायमस्वरूपी उपाय सापडला नाही. पाण्याची नासाडी केवळ स्थानिक पातळीवरच नव्हे, तर पर्यावरणीय दृष्टिकोनातूनही चिंताजनक आहे. या गळतीच्या समस्येला नगरपंचायतीकडून अद्याप ठोस प्रतिसाद मिळालेला नाही. वारंवार तक्रारी करूनही समस्या कायम राहिली आहे. नागरिकांनी नगरपंचायतीच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे आणि त्वरित उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. पाण्याची गळती थांबवण्यासाठी नगरपंचायतीकडून ठोस पावले उचलावी, अशी मागणी होत आहे.